Pakistan Clean Sweep: पाकिस्तानच्या उडाल्या चिंधड्या! इंग्लंडचा ऐतिहासिक मालिका विजय | पुढारी

Pakistan Clean Sweep: पाकिस्तानच्या उडाल्या चिंधड्या! इंग्लंडचा ऐतिहासिक मालिका विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan Clean Sweep ENGvsPAK Test : इंग्लंडने कराची कसोटीत पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला असून तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप देत अक्षरश: चिंधड्या उडवल्या. मंगळवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने सकाळी डाव सुरू केला तेव्हा त्यांना विजयासाठी फक्त 55 धावांची गरज होती. त्यानंतर बेन डकेट (82) आणि कर्णधार बेन स्टोक्स (35) या जोडीने पुढच्या 38 मिनिटांतच पाकच्या गोलंदाजांवर शेवटचा घाव घालून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. मायदेशात कसोटी 3-0 ने गमावण्याची ही पाकिस्तानची पहिलीच वेळ असून कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तानचा गेल्या 15 वर्षांतील हा पहिला पराभव ठरला आहे.

कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 304 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात एकूण 354 धावा केल्या. अशा प्रकारे इंग्लिश संघाला 50 धावांची मौल्यवान आघाडी मिळाली. यानंतर पाकिस्तानचा दुसरा डावा अवघ्या 216 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे इंग्लंडसमोर विजयासाठी 167 धावांचे लक्ष्य होते, जे इंग्लिश संघाने 2 गडी गमावून पूर्ण केले. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने तिन्ही कसोटीत शतके झळकावून मालिकेतील ‘सर्वोत्तम खेळाडू’चा बहुमान पटकावला. (ENGvsPAK Test)

इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला तो 18 वर्षीय लेग स्पिनर रेहान अहमद. त्याने जॅक लीच (3 बळी)च्या साथीने 48 धावांत पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यात त्याने दिग्गज फलंदाज बाबर आझम (54), सौद शाकिल (53), रिझवान (7) यांना बाद करून यजमान संघाचे कंबरडे मोडले. त्यामुळे पाकचा दुसरा डाव 216 धावांत गुंडाळला आणि इंग्लंडला विजयासाठी 167 धावांचे लक्ष्य मिळाले. (ENGvsPAK Test)

सामन्याच्या तिस-या दिवसाअखेर इंग्लिश संघाने झटपट सुरुवात केली आणि केवळ 17 षटकांत 2 गडी गमावून 112 धावांपर्यंत मजल मारली. यादरम्यान, जॅक क्रॉलीने 41 चेंडूंत 41 धावा केल्या. अबरार अहमदने त्याला पायचित पकडले. क्रॉलीने बेन डंकेटच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. यानंतर रेहान अहमदला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले मात्र तो 10 धावा करून बाद झाला. अखेर सामन्याच्या चौथ्या दिवशी डंकेट (78 चेंडूंत नाबाद 82 धावा) आणि कर्णधार स्टोक्स (43 चेंडूत नाबाद 35 धावा) या जोडीने सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात पाऊल ठेवले आणि केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यातच विजयी लक्ष्य गाठून 170 धावा केल्या. (Pakistan Clean Sweep ENGvsPAK Test)

इंग्लंडने रावळपिंडी येथे पहिल्या कसोटीत 74 धावांनी विजय मिळवला होता, तर मुलतानमधील दुसरी कसोटी 24 धावांनी जिंकून विजयी आघाडी घेतली. त्यानंतर कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर इंग्लिश संघाने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून पाकला धुळीस मिळवले.

नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 45 कसोटी सामन्यांमधला हा पाकिस्तानचा तिसरा पराभव होता आणि गेल्या 15 वर्षांतील पहिला पराभव होता. 2000 मध्ये इंग्लंडनेच त्यांच्यावर विजय मिळवला होता. त्यानंतर नॅशनल स्टेडियमवर सात वर्षांनी यजमान संघाला द. आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. पाकिस्तानने मायदेशात सलग चौथा कसोटी सामना गमावला आहे. तत्पूर्वी, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव करत मालिका 1-0 अशी जिंकली होती. (Pakistan Clean Sweep ENGvsPAK Test)

पाकिस्तान संघाने कसोटी क्रिकेट सुरू करून जवळपास 70 वर्षे झाली आहेत. 68 वर्षांपूर्वी पाकिस्तान संघ मायदेशात पहिली कसोटी मालिका खेळला. मात्र आजपर्यंत कोणत्याही संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांना व्हाईट वॉशचा सामना करावा लागला नव्हता. मात्र, बेन स्टॉक्सच्या नेतृत्वाखाली खेळणा-या इंग्लिश संघाने हा पराक्रम करून इतिहास रचला आहे.

हॅरी ब्रूक ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’

हॅरी ब्रूक मालिकावीर आणि सामनावीर ठरला. कराचीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 111 धावा केल्या होत्या. तीन सामन्यांच्या मालिकेतील 5 डावात जवळपास 94 च्या सरासरीने त्याने 468 कुटल्या. केल्या. त्याचवेळी रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 153 आणि दुसऱ्या डावात 87 धावा केल्या. तर दुस-या मुलतान कसोतीत त्याने पहिल्या डावात 9 आणि दुसऱ्या डावात 108 धावा फटकाल्या होत्या.

Back to top button