पालकमंत्री दादा भुसे : जिल्ह्यातील वसतिगृहांचे ऑडिट करावे | पुढारी

पालकमंत्री दादा भुसे : जिल्ह्यातील वसतिगृहांचे ऑडिट करावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील खासगी वसतिगृहातील अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील मुलाच्या खुनाची घटनादेखील गंभीर आहे. या दोन्ही घटनांची दखल घेत जिल्ह्यातील सर्व वसतिगृह व बालक आश्रमांची तपासणी करावी, असे साकडे लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री दादा भुसे यांना घातले. तालुकास्तरावर तपासणी सुरू असून, आठ दिवसांत त्याबाबत अहवाल हाती येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 12) झालेल्या जिल्हा नियोजन वार्षिक योजनेच्या बैठकीत म्हसरूळ आणि त्र्यंबकेश्वरच्या घटनेचे पडसाद उमटले. म्हसरूळ येथील ज्ञानदीप आश्रमात 7 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली. तसेच त्र्यंबक येथे बालक आश्रमातील मुलाच्या खुनाने अवघा जिल्हा हादरला होता. त्याच पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी बैठकीत वसतिगृह व बालक आश्रमांचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात अधिकृत व अनधिकृत वसतिगृहांची माहिती देणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने पालकांना योग्य ती माहिती मिळत नाही, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी केली. आ. फरांदे यांनी विद्यार्थिनींची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत आश्रमशाळा व वसतिगृहांच्या माहितीसाठी तपासणी करावी, अशी मागणी केली. ना. भुसे यांनी वसतिगृह व आश्रमशाळांचा मुद्दा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याचे सांगितले. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यात महसूल, पोलिसांसह समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी आहेत. या समितीमार्फत वसतिगृहे व बालक आश्रमांची तपासणी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. आठवडाभरात त्याचा सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमली पदार्थांचा विळखा…
नाशिक शहराला अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. या पदार्थांची सर्रास विक्री होत असताना पोलिस काय करतात? असा संतप्त सवाल लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. रिक्षामधून तसेच पानटपर्‍यांवर रात्री-बेरात्री टकटक करून पदार्थ मिळविले जातात. वडाळा भागात मध्यरात्री अमली पदार्थांचा बिनदिक्कतपणे विक्री व वापर केला जातो. यात शालेय विद्यार्थ्यांसह युवा पिढी अडकत आहे. लोकप्रतिनिधींना या बाबी आढळतात. मग, पोलिसांना का दिसत नाहीत, असाही मुद्दा आ. फरांदेंनी उपस्थित केला. तीन बालकांनी यातून आत्महत्या केली असून, ते पोलिस रेकॉर्डवर आले नसल्याचे आ. फरांदेंनी सांगितले. त्यावर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी अमली पदार्थ विक्रीबाबत 112 क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा:

Back to top button