नाशिक : 'राज्यपाल हटाव'साठी धोतरावर सह्यांची मोहीम
नाशिक(पंचवटी): पुढारी वृत्तसेवा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अवमानकारक व वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने राज्यपाल हटाव या मागणीसाठी सर्व पक्ष, सामाजिक संघटना आणि शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी त्यांच्या निषेधार्थ धोतरावर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून एक विचारसरणी काम करत आहे. त्यांच्या विचारधारेतून कायम स्वरूपी महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य होत आहे. त्यात प्रामुख्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, मंत्री चंद्रकांत पाटील हे सर्व एकाच विचारसरणीची मंडळी आहे. छत्रपती शिवराय, फुले दाम्पत्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल चुकीची आणि महाराष्ट्राला डिवचण्याची वक्तव्ये सुरू असल्याने या वाचाळविरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, आंदोलनकर्त्यांनी धोतरावर स्वाक्षरी मोहीम राबवत हे धोतर राज्यपाल भवनात कुरिअरने पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी मामा राजवाडे, चंद्रकांत बनकर, संजय फडोळ, नितीन रोटे-पाटील, सागर देशमुख, करण गायकर, किरण शेळके, माधवी पाटील, स्वाती जाधव, रोहिणी पवार, ईश्वरी पाटील, माधुरी सुर्यवंशी, रोहिणी उखाडे, अस्मिता देशमाने, राजेंद्र शेळके, संदीप जाधव, गजू घोडके, दिनेश चव्हाण, प्रशांत पाटील, नंदू दंडगव्हाळ, शरद लभडे, प्रफुल्ल वाघ, मयूर नाटकर, हिरामण वाघ, सचिन कदम, भारत पिंपळे, प्रफुल्ल पवार यांसह समस्त शिवप्रेमी आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.