नाशिक : छोट्या घंटागाड्यांवरही कर्मचारीच करणार कचरा संकलन | पुढारी

नाशिक : छोट्या घंटागाड्यांवरही कर्मचारीच करणार कचरा संकलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घंटागाडीच्या नव्या ठेक्यातील छोट्या गाड्यांमध्ये कचरा टाकताना नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्याने त्याची दखल घेत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पंचवटी विभागात पाहणी केली. तक्रारींच्या अनुषंगाने कचरा संकलनासाठी छोट्या घंटागाड्यांवरही कर्मचारी नेमणुकीचे निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांमार्फत कचरा संकलनाचे कामही सुरू झाले आहे.

गेल्या १ डिसेंबरपासून घंटागाड्यांचा नवीन ठेका सुरू झाला. परंतु, ठेक्याच्या पहिल्याच दिवसापासूनच सुमारे ८३ छोट्या गाड्यांबाबत ओरड सुरू झाल्याने ठेका पुन्हा चर्चेत आला आहे. माजी सभागृहनेते दिनकर पाटील, ठाकरे गटाचे गटनेते विलास शिंदे तसेच माजी नगरसेवक प्रियंका माने यांनी आयुक्तांची भेट घेत छोट्या गाड्यांची उंची अधिक असल्याने त्यात कचरा टाकताना नागरिकांना अडचणीचे ठरत असल्याचे तसेच छाेट्या गाड्या झोपडपट्टी तसेच गावठाण भागात न जाता मोठ्या रस्त्यांवरच फिरत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर संबंधित घंटागाड्या वेळेवर व नेमून दिलेल्या मार्गावर न धावणे, गाड्यांची पुरेशी संख्या नसणे याबाबत संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि. ६) पंचवटी विभागातील मेरी, म्हसरूळ, कलानगर, पंचवटी कॉलेजमागील काही भाग अशा विविध ठिकाणी घंटागाड्यांची पाहणी करत कचरा संकलन करण्यासाठी प्रत्येक गाडीवर कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश ठेकेदारांना दिले. त्यानुसार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, नेमून दिलेल्या मार्गांवरच घंटागाड्या धावतील याची दक्षता घेण्याची सूचनाही आयुक्तांनी केली.

आठवड्यातून दोन वेळा पाहणी

घंटागाड्यांसंदर्भात योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने आठवड्यातून दोन वेळा आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी अचानक पाहणी दौरा करून माहिती घेणार असल्याचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. तसेच कोणताही भाग कचरा संकलनाशिवाय राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सातत्याने मॉनिटरिंग करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

ठेकेदारांशी झालेल्या करारनाम्यानुसार शंभर टक्के घंटागाड्या पुरविण्याचे निर्देश दिले आहे. यापुढे कचरा संकलनासाठी कर्मचारी नागरिकांना मदत करण्याची सूचना केली आहे. तसेच मोठ्या घंटागाड्या जाऊ न शकणाऱ्या चिंचोळ्या आणि दाट वस्तीच्या ठिकाणी छोट्या गाड्या पाठविण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त- मनपा

हेही वाचा :

Back to top button