Prince Harry : ब्रिटनच्‍या राजघराण्‍याबाबत प्रिन्स हॅरीचा गौप्यस्फोट,” हा एक डर्टी गेम…” | पुढारी

Prince Harry : ब्रिटनच्‍या राजघराण्‍याबाबत प्रिन्स हॅरीचा गौप्यस्फोट," हा एक डर्टी गेम..."

वॉशिंग्टन : राजघराण्यातील व्यक्तींच्या आपण फारसे संपर्कात नाही. विशेषतः वडील किंग चार्ल्स तृतीय आणि थोरला भाऊ विल्यम याच्याशी आपण फारसे बोलत नसल्याचे प्रिन्स हॅरी ( Prince Harry ) यांनी म्हटलं आहे. कुटुंबातील काही गोष्टी जाणूनबुजून सार्वजनिक होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी एका लघुपटासाठी दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या प्रकाराला हॅरी यांनी ‘डर्टी गेम’ असे म्हटले आहे. बहुप्रतीक्षित डॉक्युमेंट्रीमध्ये मुलाखतीदरम्यान हे धक्कादायक दावे करण्यात आले आहेत.

हॅरी आणि त्यांची हॉलीवूड अभिनेत्री असलेली पत्नी मेगन मार्कल यांच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारी ही डॉक्युमेंट्री सोमवारी प्रदर्शित झाली. तीन भागांमध्ये ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली जाणार आहे. हॅरी आणि मेगन राजघराण्यासंदर्भातील कोणत्या गोष्टींबद्दल भाष्य करतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. ‘ड्यूक’ आणि ‘डचेस ऑफ ससेक्स’ असे शाही बिरुद असलेल्या या दोघांकडून अनेक गौप्यस्फोट केले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दोन वर्षांपूर्वी हॅरी आणि मेगन यांनी राजघराण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि ते अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झाले. त्यांच्या या निर्णयामुळे ब्रिटिश राजघराण्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या ज्यामध्ये वर्णद्वेषी वागणूक दिल्याचा मुद्दाही चर्चेत होता. हॅरी यांनी या मुलाखतीमध्ये आपण आता राजघराण्यातील व्यक्तींच्या संपर्कात फारसे नाही असेही म्हटले आहे. खास करून इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स यांच्याशी तसेच थोरला भाऊ प्रिन्स विल्यम्सबरोबर आपण फारसे बोलत नाही, असेही हॅरी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

आम्हाला पूर्ण सत्य ठाऊक आहे : Prince Harry

“कोणालाही पूर्ण सत्य ठाऊक नाही मात्र आम्हाला पूर्ण सत्य ठाऊक आहे,” असे हॅरी या डॉक्युमेंट्रीच्या ट्रेलरमध्ये सांगताना दिसतात. तर मेगन या आपले अश्रू पुसत असल्याचे दिसत आहे. या छोट्या क्लिपमध्ये ब्रिटिश राजघराण्याचे वास्तव्य असलेल्या बकिंघम पॅलेसमध्ये काम करणारे लोक राजघराण्यातील व्यक्तींबद्दल पत्रकारांना माहिती पुरवत असल्याचे हॅरी सांगत आहेत. “कुटुंबामध्ये एक नियोजित उतरंडीची पद्धत (हायरारकी) आहे. खासगी माहिती बाहेर जात आहे याची कल्पना आहे; पण काही गोष्टी जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत. हा एक घाणेरडा खेळ (डर्टी गेम) आहे,” असे हॅरी सांगतात.

हेही वाचा…

Back to top button