नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
रिकाम्या आयशरची केबिन चेक केली असता त्यात असलेल्या एका छुप्या कप्प्यातून सुमारे 28 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या कळवण विभागाने ही दमदार कारवाई केली आहे.
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग यांनी (दि. 5) नाशिक कळवण रोडवरील अकराळे फाटा येथे आयशर गाडी क्रमांक एम एच 48 ए वाय 3663 या गाडीला सापळा रचून तपासणी केली. यावेळी गाडीपूर्णपणे रिकामी असल्याचे निष्पन्न झाले. परंतु अधिकाऱ्यांनी गाडीची केबिन चेक केली असता त्या केबिनमध्ये एक छुपा कप्पा आढळून आला. त्यामध्ये गोवा राज्यातील 27 लाख 70 हजार 720 रुपये किंमतीचा मद्य साठा आढळून आला.
या प्रकरणात आरोपी हंसराजभाई मोहनभाई ठाकूर रा. पलसान, सुरत याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच काही आरोपी व वाहन मालक फरार असून त्यांचा तपास चालू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विजय सूर्यवंशी, सुनील चव्हाण, अर्जुन ओहळ व अधीक्षक गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. शस्त्रबुद्धे, एम. बी. सोनार, आर. एम. डमरे, डी. एन. आव्हाड यांनी ही कारवाई यशस्वी केली.