नेवासा : पुढारी वृत्तसेवा : भाव वाढतील या आशेवर शेतकर्यांनी कांदा साठवून ठेवला खरा. मात्र, कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकर्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. लाल कांदा बाजारात आल्याने आता शेतकर्यांना गावरान कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. तालुक्यातील शेतकर्यांचे उसाबरोबरच कांदा हे मुख्य नगदी पीक असून, या पिकावर शेतकर्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते. परंतु, आठ महिने उन्हाळी कांद्याची साठवणूक करून देखील त्यातून चार पैसे पदरात पडत नसतील तर, कांदा साठवणूक करायची कशाला? असा प्रश्न शेतकर्याना भेडसावत आहे. कांद्याला भाव नसल्यानेच अनेकांचा कल गहू पिकाकडे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे क्षेत्र वाढणार आहे.
सुरुवातीला एप्रिल-मे महिन्यात शेतकर्यांनी उन्हाळी कांदा काढला. त्यावेळीही शेतकर्यांना हाच दर मिळत होता. आता आठ महिने कांदा साठवण करूनही वजनात घट, सडण्याचे प्रमाण, यामुळे 30 ते 40 टक्के घट येऊनही शेतकर्यांची पाहिजे तशी पडताळ बसत नसल्याने उन्हाळी कांदा साठवणूक करून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मध्यंतरी तीन हजारांच्यावर गेलेला कांदा आठ महिन्यांपासून चाळीत ठेवूनही शेतकर्यांना 600 ते 1300 रूपये दराने विकावा लागत आहे. साठवलेल्या कांद्यात सडण्याचे, मोड येण्याचे प्रमाण, यामुळे मोठ्या प्रमाणात घट येत असल्याने अर्थचक्र बिघडल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.
कांदा पिकाला दिवसेंदिवस अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे लाल कांदा लागवड उशिरा झाली. पर्यायाने चाळीत साठवलेल्या उन्हाळी कांद्यातून चार पैसे पदरात पडतील, अशी शेतकर्यांना आशा होती. परंतु, केंद्र सरकारच्या धोरणामुळे संभ्रमात सापडलेल्या शेतकर्यांचा कांदा मात्र भरडला गेला असून, आहे त्या भावात उन्हाळी कांद्याची विक्री करावी लागत आहे. दरम्यान, शेतकर्यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी लागवड केलेला लाल कांदा बाजारात येऊ लागल्याने, त्याला पंधराशे ते दोन हजार दर मिळत आहे. उन्हाळी कांदा शेतकर्यांनी टिकवून धरला, पण कांदा टिकवूनही त्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.