एनआयएचे आश्वासक पाऊल | पुढारी

एनआयएचे आश्वासक पाऊल

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही देशातील दहशतवादाशीसंबंधित मोठ्या घटनांची चौकशी करीत असून, या संस्थेला अलीकडच्या काळात चांगले यश हाती लागलेले आहे. आता पंजाबमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एनआयएने कॅनडात असलेल्या गँगस्टरना यूएपीएअंतर्गत व्यक्तिगत दहशतवादी घोषित करण्याची योजना तयार केली आहे. ‘गँग्स ऑफ पंजाब’ची कहाणी ‘गँग्स ऑफ वासेपूर’पेक्षा अधिक गुंतागुंतीची झाली आहे. यावर लवकर पकड बसविली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. यादृष्टीने एनआएची कारवाई आश्वासक वाटते.

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही ‘एनआयए’ या नावानेही ओळखली जाते. दहशवादाविरुद्धच्या लढ्यामुळे या संस्थेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. भारताची विविधता, सुरक्षा आणि अखंडतेसाठी या संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दहशतवादाचे जाळे गुंतागुंतीचे, आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय संपर्काने व्यापलेले असते. शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी, टार्गेट किलिंगच्या घटना आणि मनी लॉन्ड्रिंग याच्याशी दहशतवादाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असतो. एनआयएने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाची आर्थिक रसद रोखण्यासाठी भरीव काम केले आहे. अनेक दोषींना दंड करण्यासाठी छापेमारी केली आहे. देशात दहशतवादाशी संबंधित मोठ्या घटनांची चौकशीसुद्धा ही संस्था करीत आहे आणि या संस्थेला काही प्रमाणात यशही मिळाले आहे.

एनआयएची स्थापना 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाली. एनआयए केवळ तपास संस्थाच नाही तर खटला चालवणारीही संस्था आहे. आता पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्लीच्या तुरुंगात असणार्‍या गँगस्टरना एनआयए धडा शिकवणार आहे. या सर्व गँगस्टरना दक्षिण भारतातील तुरुंगांत हलविण्याबाबतचा प्रस्ताव एनआयएने गृह मंत्रालयाला दिला आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडाच्या चौकशीदरम्यान एनआयएच्या लक्षात आले की, तुरुंगातील गँगस्टर अत्यंत सहजपणाने गुन्हा घडवितात. कारण, आजूबाजूला त्यांचे जाळे पसरलेले असते. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील गँगस्टरचे संबंध तर कॅनडा, ब्रिटन किंवा अन्य ठिकाणी बसलेले कुख्यात गँगस्टर, माफिया डॉनशी जुळलेले आहेत. या गँग श्रीमंत व्यापारी, मद्यव्यापारी, सट्टेबाज आणि अन्य लोकांकडून पैसे वसूल करतात.

संबंधित बातम्या

पैसे नाही मिळाले तर त्यांची हत्या केली जाते. या गुन्हेगारीच्या आडून खलिस्तान समर्थकही आपला कट यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर्षी आतापर्यंत पंजाबात आठ लोकांच्या हत्या विविध गँगशी संबंधित गुन्ह्यांमुळे झाल्या आहेत. पंजाबात सध्याची स्थिती खूपच गंभीर असल्याबाबत सांगितले जात आहे.

एनआयएने कॅनडात असलेल्या गँगस्टरना अनलॉफूल अ‍ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट (यूएपीए) अंतर्गत व्यक्तिगत दहशतवादी घोषित करण्याची योजना तयार केली आहे.

एनआयएच्या एका उच्चस्तरीय बैठकीदरम्यान यूएपीएच्या यादीमध्ये सतिंदरजित सिंह ऊर्फ गोल्डी बराडसारख्या गँगस्टरची नावेही सामील करावीत यावर चर्चा करण्यात आली. कारण, गायक सिद्धू मुसेवाला हत्येचा तो मास्टरमाईंड होता. तसेच कॅनडात राहणार्‍या अनेक गँगस्टारची नावेही या यादीत टाकण्यात यावीत, यावर चर्चा झाली. यातील अर्शदीप सिंह ऊर्फ अर्श डाला याचे नाव गृह मंत्रालयाकडे (एमएचए) ‘व्यक्तिगत दहशतवादी’ घोषित करण्यासाठी पाठविले जात आहे.

यूएपीएच्या अंतर्गत व्यक्तिगत दहशतवाद्यांच्या यादीत सध्या 48 लोकांची नावे आहेत. यातील अनेक जण पाकिस्तानपुरस्कृत इस्लामिक दहशतवादी संघटनांशी किंवा खलिस्तानी समूहांशी संबंधित आहेत. सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतर नवनवे खुलासे समोर येत आहेत. पंजाबात जेव्हा कोणताही नवीन गुन्हा घडतो त्यामागे विदेशात बसलेल्या कोणत्या ना कोणत्या गँगस्टरचा किंवा कट्टरपंथीयाचा हात असतो. विशेष म्हणजे गुन्हेगार ही बाब लपविण्याचा किंवा दाबून टाकण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. ते मीडियाच्या माध्यमातून गुन्ह्याची किंवा हत्येची जबाबदारी स्वतःकडे घेतात. यावरून हे स्पष्ट होते की, पंजाबातील गँगवॉर हे केवळ पैशांसाठी नसून तथाकथित कट्टरतावादासाठी आहे.

एरवीदेखील ही जगाला लागलेली मोठी कीड आहे. भारताला तर सातत्याने शेजारील देशांपासून दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एनआयएकडून सातत्याने केल्या जाणार्‍या धडाकेबाज कारवाया देशाच्या सुरक्षेत मोलाची भूमिका बजावत आहेत. भारताला चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जेरीला आणण्यासाठी टपून बसले आहेत. त्यामुळे जागतिक व्यासपीठांवरून भारताने नेहमीच शांततापूर्ण सहअस्तित्वाची भूमिका मांडली आहे. तथापि, काही देशांकडून दहशतवादाला उत्तेजन दिले जात असून, त्याचा फटका भारताला बसत आहे.

एनआयए ही संस्था याच दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. शेजारील देशांना भारताची प्रगती झालेली नको आहे. त्यामुळेच त्यांनी छुप्या पद्धतीने दहशतवाद पोसला आहे. याच आव्हानाचा मुकाबला भारत करत आला आहे. यापुढेही त्याला पर्याय नसेल. जर शत्रूला धडा शिकवायचा असेल तर आपणच एवढे

शक्तिशाली झाले पाहिजे की, कोणाची आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतच होता कामा नये. सुरक्षा दलांमधील समन्वय हा घटकही त्यासाठी महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्या दिशेने उचललेली भक्कम पावले दहशतवादाला जरब बसवणारी आहेत यात शंका नाही.

दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी झीरो टॉलरेन्सची नीती वापरावी लागणार आहे. सध्या गृह मंत्रालय तिचा अवलंब करीत आहे. पंजाब पोलिसांकडून तुरुंगात छापेमारी करून या गँगस्टरचे संपर्क सूत्र पकडत आहेत. मात्र, हिंसेला लगाम घालण्यासाठी केंद्रीय तपास संस्थांसोबत ताळमेळ राखणे गरजेचे आहे.

‘गँग्स ऑफ पंजाब’ची कहाणी ‘गँग्स ऑफ वासेपूर’पेक्षा अधिक गुंतागुंतीची झाली आहे. यावर लवकर पकड बसविली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या दृष्टीने एनआएची कारवाई आश्वासक वाटते.

– अपर्णा देवकर

Back to top button