जागतिक एडसदिन : धुळ्यात एड्स जनजागृती रॅली | पुढारी

जागतिक एडसदिन : धुळ्यात एड्स जनजागृती रॅली

धुळे: पुढारी वृत्तसेवा

एचआयव्ही एडस हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी कुठलाही उपचार नाही. त्यामुळे एड्स वर प्रतिबंध हाच एकमेव उपचार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत गुरुवारी, दि.1 जागतिक एड्स दिनानिमित्त धुळे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, धुळे, जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे आयोजित प्रभात फेरीला जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून प्रारंभी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मशरुर शेख, क्षयरोग विभागाचे डॉ. प्रकाश सावंत, डॉ. शिल्पा राव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शीतल पाटील आदि उपास्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा पुढे म्हणाले की, एड्सला प्रतिबंधविषयी प्रभात फेरीसह पोस्टर प्रदर्शनातून जनजागृती होण्यास मदत होईल. तरुणांनी या आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर अठरा वर्षे वय पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींनीही ऑनलाईन मतदार नोंदणी करावी. तसेच मतदार कार्डही बनवून घ्यावे. जागतिक एड्स दिन 2022 ची थिम आपली एकता, आपली समानता एचआयव्हींसह जगणा-यांकरिता ही आहे. यावेळी डॉ. वानेरे यांनी शपथचे वाचन केले. एड्स या आजाराबाबत जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले होते. या दिनाच्या निमित्ताने आयोजित प्रभातफेरीस जिल्हाधिकारी शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. प्रभातफेरी जिल्हा रुग्णालय, साक्री रोड, गुरुशिष्य स्मारक चौक, टॉवर बगीचा मार्गे, मामलेदार कचेरी, जेल रोडवरुन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संतोषीमाता चौक मार्गे जिल्हा रुग्णालयात प्रभात फेरीचा समारोप झाला. प्रभातफेरीत शहरातील लोकप्रतिनिधी, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थीनींसह शिक्षक, शिक्षिका, विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा कार्यक्रम अधिकारी शीतल पाटील यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक विलास पाटील यांनी सूत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार मानले.

हेही वाचा:

Back to top button