Nashik Crime : अल्पवयीन मुलावर अत्याचार करीत ब्लेडने वार | पुढारी

Nashik Crime : अल्पवयीन मुलावर अत्याचार करीत ब्लेडने वार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथे अल्पवयीन मुलांवर अत्याचाराच्या घटना एकापाठोपाठ उघड होत असून, आधीच्याच घटना ताज्या असतानाच आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मित्रावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, संशयितांनी मित्राला दगड मारून त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले आहेत. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात पोक्सोसह अनैसर्गिक अत्याचार, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघे संशयित पीडित मुलाचे मित्र आहे. मंगळवारी (दि. 29) पीडित मुलगा सकाळी ११.३० च्या सुमारास शाळेत जाण्यासाठी पायी निघाला असता, त्याला दोन्ही संशयित रस्त्यात भेटले. त्यानंतर तिघेही शिवाजीनगर परिसरात गेले. त्या ठिकाणी दोघांनी पीडित मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगू नये यासाठी दोघांनी पीडित मुलास दगड मारला व त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार करून दुखापत केली.

पीडित बालकाने हा प्रकार त्याच्या घरी सांगितल्यानंतर त्याच्या आईने सातपूर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी केली व त्यानंतर दोघांचा ताबा पालकांकडे सोपविला आहे.

हेही वाचा :

Back to top button