धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल | पुढारी

धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा

खूनाच्या गुन्ह्यात अंतरीम जामीन मंजूर झालेल्या कुख्यात आरोपीची मिरवणूक काढणे त्याच्या समर्थकांना चांगलेच महागात पडले आहे. ही मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांसह तथाकथित म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मिरवणूक काढलेल्या या कुख्यात गुन्हेगारावर खून, खुनाचा प्रयत्न तसेच लूट यासारखे 27 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.

शहरातील चाळीसगावरोड पोलीस ठाण्याच्या परीसरात एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. यात जखमी युवकाचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून  गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्यातील सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल (रा. अंबिकानगर) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी करण्यात आले आहे. मात्र सत्तार पिंजारी हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता. या कालावधीत त्याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर झाल्यानंतर सत्तार पिंजारी हा अंबिकानगर परिसरात त्याच्या घरी आला. या भागामध्ये त्याची दहशत वाढून दबाव निर्माण व्हावा ,या उद्देशाने त्याच्या समर्थकांनी अंबिका नगर पासून अंजनशहा दादा सरकार दर्गा पर्यंत मिरवणूक काढली. ही बाब पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांना या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात सत्तार पिंजारी यांच्यासह त्याच्या समर्थकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार गुरुवारी, दि. 1 रोजी पोलीस पथकाने सत्तार मासून पिंजारी, समीर मण्यार सईद मन्यार, अमीर रियाज शेख उर्फ अमीर माया ,गुलाब रसूल शब्बीर अहमद अन्सारी, शेख सोहेल शेख सलीम उर्फ सिंधी ,शोएब खान गुलाब खान, मोहम्मद फारुख खान उर्फ भिल्ल, मोहम्मद शाहिद मोहम्मद रियाज अहमद, अख्तर नहीम कुरेशी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चार दुचाकी तसेच मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेले ढोल ताशे देखील जप्त करण्यात आले आहे. गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button