नाशिक : मार्केट यार्डातून 50 क्विंटल मका चोरीला, भुरट्या चोरांचा सुळसुळाट | पुढारी

नाशिक : मार्केट यार्डातून 50 क्विंटल मका चोरीला, भुरट्या चोरांचा सुळसुळाट

नाशिक (देवळा : पुढारी वृत्तसेवा

येथील देवळा बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डातून ५० क्विंटल मक्याचे ८२ कट्टे चोरीस गेल्याने मका व्यापारी दिनकर गुंजाळ यांचे जवळपास १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, गुंजाळ यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे भुसार मालाचे खरेदीदार व्यापारी दिनकर केदा गुंजाळ हे मका खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी खरेदी केलेली मका बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डात असतो. दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास यातील भरून ठेवलेले ८२ कट्टे (आजच्या बाजार भावप्रमाणे १ लाख १० हजार रुपये) किमतीचा जवळपास ५० क्विंटल मका अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. मार्केट यार्डातून आपली मका चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर गुंजाळ यांनी बाजार समितीकडे तक्रार केली. यानंतर सचिव माणिक निकम यांनी देवळा पोलिसांत या घटनेची तक्रार दाखल केली. यात त्यांनी मार्केट यार्डात लिलावासाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्ट्ररांची बॅटरी तसेच इतर सामान चोरीस गेल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

मार्केट यार्डात वारंवार अशा घटना घडत असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  मका चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून, पोलिसांनी याची कसून चौकशी करावी व कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिव माणिक निकम यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button