पिंपरी : मिळकतीला मोबाईल लिंक केल्यास सवलत | पुढारी

पिंपरी : मिळकतीला मोबाईल लिंक केल्यास सवलत

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मिळकतधारकांनी मोबाइल क्रमांक मिळकतींना लिंक केल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने सामान्यकरात तीन टक्के सवलत देण्यात येणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.30) सांगितले.
शहरात 5 लाख 88 हजार मिळकतींची नोंद आहे.

या मिळकतींपैकी आतापर्यंत 2 लाख 80 हजार मिळकतधारकांचे मोबाइल क्रमांक लिंक झाले आहेत. उर्वरित तीन लाख 8 हजार मिळकतींना मोबाईल क्रमांक लिंक नाहीत. ऑनलाइन कर भरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन कर भरताना नागरिकांकडून त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला जात आहे. हा क्रमांक मिळकतींना लिंक होत आहे.

मोबाइल क्रमांक लिंक झाल्याने मिळकतधारकांना पालिकेच्या विविध योजनांची माहिती व दरवर्षी कराचे बिलाची मोबाइलवर लिंक येणार आहे. त्यामुळे नागरिकांना कर भरण्यास अधिक सोईचे होणार आहे. जेणेकरून एखादा नागरिक प्रवासात असला किंवा शहराबाहेर असल्या तरी तो कर भरू शकेल, हा पालिकेचा उद्देश आहे.

जे मिळकतधारक 31 डिसेंबर 2022 पूर्वी त्यांचे मिळकतीला मोबाईल क्रमांक लिंक किंवा अद्ययावत करुन थकबाकी व चालू मागणीचे मूळ कराची रक्कम ऑनलाइन पध्दतीने भरणा करतील अशा मिळकतधारकांना चालू मागणीतील सामान्यकरात 3 टक्के सवलत मिळणार आहे.

मोबाईल क्रमांक जोडून सवलतीचा लाभ घ्या
मिळकतकर भरण्यासह नागरिकांना करसंकलन विभागाच्या सर्वसुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मिळकतीला मोबाईल क्रमांक जोडून सामान्य करात तीन टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

Back to top button