सावरकरांबद्दल बोललेले खपवून घेणार नाही : भास्कर जाधव | पुढारी

सावरकरांबद्दल बोललेले खपवून घेणार नाही : भास्कर जाधव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यात युती जरी असली तरी सावरकरांबद्दल वाईट बोललेले खपवून घेणार नाही. शिवसेना त्यांच्याबद्दल काहीही सहन करणार नाही. आपण एकत्र असलो तरीदेखील आपल्याला वैयक्तिक मते आहेत. मात्र, त्याचा असा अर्थ नाही की काहीही बोललेले सहन केले जाईल, असे खडे बोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी संभाजी ब्रिगेडच्या मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांना व्यासपीठावरून सुनावले.

दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिन कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाधव बोलत होते. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जितावस्था निर्माण करण्यासाठी दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो. हा मान यावर्षी नाशिकला मिळाला आहे. यावेळी राज्य कार्यकारिणीचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे व सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

सावरकरांबद्दल काढलेले उद्गार प्राध्यापक तुम्हाला शोभत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सावरकरांबद्दल बोलले म्हणून तुम्ही आम्ही बोलू शकत नाही. तो डॉ. आंबेडकरांचा अधिकार आहे. सावरकरांना दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे. मी अंदमान येथे जाऊन ती कोठडी बघून आलो आहे. तिथे त्यांना होणाऱ्या यातना बघितल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीही अपवाक्य खपवून घेतले जाणार नाही. आपल्याच व्यासपीठावरून मी आज आपल्याला सांगत आहे. आपली युती झाली त्यामुळे आपले मत एक असावे, असे काही नाही. एकाच व्यासपीठावर असताना तुम्ही बोलण्याचे भान ठेवा, मीदेखील ठेवेल, असेदेखील जाधवांनी यावेळी सुनावले.

तत्पूर्वी, संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी भाषणात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाली. त्यामुळे देशात चर्चा झाली आहे. २०२४ मध्ये फक्त राज्यात नाही तर देशातून भाजपची पिलावळ नष्ट करू. संभाजी ब्रिगेड यापूर्वी फक्त सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था होती. आता ती राजकीय वाटचाल करत आहे. त्यामुळे राजकारणात आता सर्वसामान्य चेहरे दिसतील. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांसोबत आम्ही सर्वजण आहोत याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. देशात जर परिवर्तन पाहिजे असेल तर नक्कीच आता पेटून उठावे लागेल. आम्हाला हिटलरशाही नको आहे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त करून द्यायचे आहे. सावरकर यांनी डॉ. आंबेडकरांनी जेव्हा बौद्धधर्म स्वीकारला तेव्हा विखारी भाषेत लेख लिहिला होता. त्यावर डॉ. आंबेडकरांनी तोडीस तोड उत्तर दिले होते, असे सांगत सावरकर तर आमच्या खिजगणतीतदेखील नाही, अशी टीका केली.

यावेळी भास्कर जाधव यांनी चौफेर फटकेबाजी करत संभाजी ब्रिगेड राष्ट्रपुरुषांचे विचार घेऊन पुढे जाणारी ब्रिगेड आहे. यांचे राजकीय ध्येय शिवसेनेच्या साथीने पूर्ण होवो, या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशात घटना, संविधानाला अभिप्रेत असलेली सत्ता चालवली गेली पाहिजे, मात्र, गेली 7-8 वर्षे राज्यघटना, संविधान, लोकशाही, निवडणूक आयोग, सीबीआय अशा संस्था अबाधित राहणार का, मोडीत निघणार का, अशी भीती सर्वसामान्यांना होत आहे. ऋतुजा लटके यांचा विजय म्हणजे देशातील अनागोंदी कारभाराचा विजय आहे. संभाजी ब्रिगेडची ताकद सेनेच्या पाठीशी आहे. सेनेने जातीपातीचे राजकारण केले नाही. छत्रपतींचे विचार घेऊन संभाजी ब्रिगेडची वाटचाल सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखे साधे संयमी आणि जमिनीवर चालणारे व्यक्तिमत्त्व सेनेकडे आहे, ते काही तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्हीही सोडू नका, असे म्हणत या युतीची विशेष घोषणा यावेळी जाधवांनी केली.

यावेळी उपस्थित नाशिकचे निरीक्षक डॉ. संदीप कडलग, जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्निल इंगळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोटे-पाटील, उपजिल्हाप्रमुख विशाल अहिरराव, सरचिटणीस विकी गायधनी, लोकसभा अध्यक्ष शरद लभडे, मंदार धिवरे, सागर पाटील, अक्षय आठवले, हरेश्वर पाटील, राकेश जगताप, संकेत चराटे, चेतन पगारे, प्रथमेश पाटील व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button