पुणे : गोवरचे दीडशे नमुने निगेटिव्ह; शहरातील 60 अहवालांची प्रतीक्षा | पुढारी

पुणे : गोवरचे दीडशे नमुने निगेटिव्ह; शहरातील 60 अहवालांची प्रतीक्षा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात अद्याप गोवरचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी खबरदारीच्या उपाययोजना महापालिकेकडून राबविण्यात येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गोवर संशयित बालकांचे सर्वेक्षण सुरू केले, त्यातील दीडशे बालकांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 60 बालकांच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गोवरची लागण झालेले रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून, लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे.

कारण, मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश बालकांचे गोवर रुबेला (एमआर) लसीकरण झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पुणे शहरात लसीकरण न झालेल्या बालकांना याचा धोका संभवू शकतो म्हणून अगोदरच त्यांचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासन काम करीत आहे. दरम्यान, महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळलेल्या बालकांचे नमुने घेऊन ते मुंबईमधील हाफकिन इन्स्टिट्यूटला तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. परंतु, मुंबईमध्ये जादा संशियत असल्याने अहवाल येण्यास वेळ लागत असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सध्या साठ संशयित बालकांचे नमुने प्रलंबित आहेत.

महापालिकेच्या दवाखान्यामध्ये बाह्यरुग्ण विभागामध्ये आठवड्यातून दोनदा आणि अंगणवाडीमध्ये एकदा नियमित लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी जोखीमग्रस्त, अतिजोखीमग्रस्त ठिकाणी आणि रस्त्यावर आढळणारी बालके यांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात येत आहे. महापालिका रुग्णालयांतर्गत प्रत्यक्ष सर्व्हे करून तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या लोकसंख्येच्या आधारे शून्य ते दोन वर्षे आणि दोन ते पाच वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

लस घेणे अनिवार्य…
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत बालकांना गोवर-रुबेला (एमआर) लस घेणे अनिवार्य आहे. मात्र, अनेकांकडून बालकांचे लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येते किंवा बघू नंतर देता येईल, काही होत नाही, असा दृष्टिकोन असतो. अशा पालकांच्या चालढकलीमुळे बालकांना गोवरची लागण होऊ शकते. म्हणून गोवर-रुबेला लसीकरण घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

असे करा लसीकरण…
गोवरच्या लसीचा पहिला डोस नऊ ते बारा महिने वयोगटातील बालकांना देण्यात येतो, तर दुसरा डोस हा सोळा ते चोवीस महिने वयोगटातील बालकांना देण्यात येतो.

हा आहे औषधोपचार….
संशयित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये विलगीकरणात किंवा सौम्य असेल तर घरामध्येच विलगीकरणामध्ये ठेवून व्हिटॅमिन ए आणि लस घेतली नसेल तर लस देण्यात येते. तसेच ताप असेल तर तापावरील औषध दिले जाते.

लस न घेतलेल्या बालकांचे आणि गोवर संशयित बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. इतर ठिकाणी आढळलेल्या रुणांमध्ये लसीकरण न झालेले आढळले, त्यामुळे लसीकरण करण्यावर अधिक भर दिला जात आहे. संशयित बालकांची तपासणी करण्यात येत आहे. नमुने गोळा करून ते हाफकिन इन्स्टिट्यूटला पाठविले जातात. दीडशे नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, साठ अहवाल अद्याप आलेले नाहीत.
                                                        – डॉ. सूर्यकांत देवकर,
                                        सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

Back to top button