पुणे : सोशल मीडियावरील जाहिराती लठ्ठ व्यक्तींची करताहेत दिशाभूल | पुढारी

पुणे : सोशल मीडियावरील जाहिराती लठ्ठ व्यक्तींची करताहेत दिशाभूल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 10 दिवसांत 15 किलो वजन कमी करा’…’वजन कमी करायचे असल्यास हो, असा रिप्लाय करा…’ अशा जाहिरातींचा सध्या सोशल मीडियावर भडिमार पाहायला मिळतो आहे. वजन कमी करण्यासाठी नानाविध प्रयत्न करून थकलेल्या लठ्ठ लोकांची अशा जाहिरातींमधून दिशाभूल केली जात आहे. अनैसर्गिक पध्दतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

जीवनशैलीतील बदलांमुळे, आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्वच वयोगटांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढीस लागली आहे. विशेषत:, महिलांमध्ये बाळाचा जन्म, थायरॉईड, पीसीओडी, मधुमेहपूर्व स्थिती, हार्मोन्समधील असंतुलन अशा विविध कारणांनी वजन झपाट्याने वाढते. लठ्ठपणामुळे थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, आत्मविश्वासाचा अभाव, चिडचिड होणे अशा अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सोशल मीडियावर उपाय शोधणार्‍यांचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे.

एकीकडे बरेच आहारतज्ज्ञ अत्यंत प्रामाणिकपणे आणि नैसर्गिक पध्दतीने वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन करताना दिसतात. दुसरीकडे, विविध औषधे, पावडर, सप्लिमेंट अशा उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार करून ’मनासारखा आहार घेऊन, व्यायाम न करताही झपाट्याने वजन कमी करा’ अशी दिशाभूल करणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. जाहिरातीखाली किंंवा पोस्टखाली ’हो’ असा रिप्लाय केल्यावर अनैसर्गिक पध्दतीने वजन कमी करण्याचे उपाय सुचवले जात असल्याचे दिसून आले आहे.

Back to top button