नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारने 'चला जाणू या नदी' अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सात नद्यांची निवड केली असून त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी त्या-त्या भागातील प्रांतधिकार्यांकडे सोपविण्यात आली आहे.
'चला जाणू या नदी' अभियानांतर्गत जिल्ह्या-जिल्ह्यांतील नद्यांच्या समस्या सोडविताना सर्वसामान्यांमध्ये नद्यांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावर सचिवांच्या तसेच जिल्हा पातळीवर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करायच्या आहेत. ही समिती एक वर्ष किंवा पुढील आदेश होईपर्यंत कायम असेल. अभियानांतर्गत जिल्ह्यातील नंदिनी, कपिला, वरुणा, वालदेवी, अगस्ती, मोती आणि म्हाळुंगी या सात नद्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अभियानावेळी या नद्यांच्या क्षेत्रात राबविल्या जाणार्या उपक्रम, जनजागृती व नदी संवाद यात्रा यासाठीची जबाबदारी स्थानिक प्रांताधिकार्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी तसे आदेश काढले आहेत. नाशिकच्या प्रांतांकडे नंदिनी, कपिला व वरुणा अशा तीन नद्यांची जबाबदारी असणार आहे. त्याखालोखाल येवल्याच्या प्रांतांकडे दोन, तर त्र्यंबकेश्वर आणि निफाड प्रांतांकडे प्रत्येकी एका नदीची जबाबदारी असेल. दरम्यान, नद्या संवर्धनासाठी शासनाने अभियानातून उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे भविष्यात किमान नद्यांचे प्रदूषण रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
नद्यांसाठी नेमलेले अधिकारी याप्रमाणे…
नंदिनी – नाशिक प्रांत
कपिला – नाशिक प्रांत
वरुणा – नाशिक प्रांत
वालदेवी – त्र्यंबक प्रांत
अगस्ती – येवला प्रांत
मोती – येवला प्रांत
म्हाळुंगी – निफाड प्रांत