नगर : धक्कादायक ! 6 महिन्यांत 78 जणांना कॅन्सर ; तरूणाई व्यसनांच्या विळख्यात | पुढारी

नगर : धक्कादायक ! 6 महिन्यांत 78 जणांना कॅन्सर ; तरूणाई व्यसनांच्या विळख्यात

गोरक्षनाथ शेजूळ :

नगर :  तंबाखूजन्य पदार्थ सेवनातून होणार्‍या दुष्परिणामांबाबत शासनाकडून व्यापक जनजाृगतीसोबतच कोटपा सारखे कायदेही आणले गेले. धुम्रपानाचा टक्का कागदावर कमी झालेला दिसत असला, तरी सहा महिन्यांत मुख कॅन्सर आणि इतर कॅन्सरचे तब्बल 87 रुग्ण आढळले आहेत. तंबाखू, मावा, खर्रा, जर्दा आणि आता ई सिगारेट सेवनातही गुुरफटणार्‍या तरूणाईचा वाढता टक्का हा चिंतेचा विषय आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2017-18 पासून सूरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे हे सदस्य सचिव आहेत. या कार्यक्रमातून तंबाखूमुक्त शाळा आणि कोटपा कायदा 2003 ची अंमलबजावणी केली जाते.

कॅन्सरचे रुग्ण आढळल्यानंतर यातील बहुतांशी रुग्ण हे सिगारेटपेक्षा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनातून कॅन्सर बाधित झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्यामुळे पालकांनी, शिक्षकांनी तसेच गावच्या ग्रामपंचायतींनीही अशा पदार्थावर बंदीसाठी ग्रामसभेची मदत घेण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यातील तंबाखूजन्य पदार्थातून झालेल्या कॅन्सरच्या 78 रुग्णांपैकी साधारणतः 5 ते 6 महिला बाधित झालेल्या आहेत. यातील काही महिला तंबाखू तर काही मिसरी लावत असल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आले आहे. प्रामुख्याने तोंडाचा, घशाचा कॅन्सर आपल्या ऐकिवात आहे. मात्र याशिवाय स्तन कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर आणि इतर कॅन्सरचे रुग्ण देखील आढळून येत आहेत.

जिल्ह्यात खुलेआम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असताना अन्न व औषध प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच आज चौकाचौकात मावा, जर्दा, तंबाखू खुलेआम विकली जाते. यातून तरूणाईच्या आयुष्याचे वाटोळे होताना दिसतआहे.  दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. हर्षल पठारे, समन्वयक डॉ. सुरेश घोलप, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समुपदेशक गणेश शिंदे, जिल्हा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जटाटे आदी तंबाखूमुक्तीसाठी परिश्रम घेत आहेत.

कॅन्सरची लक्षणे

प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र या ठिकाणी रुग्णाची प्राथमिक तपासणी केली जाते. यामध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस तोंडात गाठ येणे, लाल पांढरा चट्टा असणे, तोंड उघडता न येणे, महिनाभर तोंडातील जखम बरी न होणे इत्यादी लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. जिल्ह्यात सहा महिन्यांत मुखकॅन्सरचे 38 रुग्ण आहेत. हा कॅन्सर तंबाखूजन्य पदार्थपासून होतो. तसेच स्तन, गर्भाशय कॅन्सरचे 97 महिला रुग्ण आहेत. याशिवाय इतर कॅन्सर म्हणजे पोटाचे, फुफसाचे असे 40 रुप्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 13 लाख 43 हजार 301 इतके 30 वर्षांवरील तरूण आहेत.  यापैकी आरोग्य विभागाने 6 लाख 61 हजार 395 तरुणांची तपासणी केलेली आहे. ही तपासणी करताना उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कॅन्सर आणि महिलांच्या कॅन्सरची तपासणी केली आहे. यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय तंबाखू जन्य पदार्थ प्रतिबंधासाठी पुढाकार घेत असले तरी येथे कॅन्सर तज्ज्ञ हे पद रिक्त असल्याने उणीव जाणवते.

मला तंबाखू सोडायची !

ज्या लोकांना स्वयंस्फुतीने तंबाखू सोडायची आहे, अशा लोकांसाठी जिल्हा रुग्णालय आणि 22 ग्रामीण रुग्णालयांत तंबाखू मुक्ती केंद्र सुरू केलेले आहे. तेथे सहा महिने समुपदेशन केले जाते. एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत 1062 लोकांनी तंबाखू सोडायची असून, आम्हाला समुपदेशन करावे, यासाठी नोंदणी केली आहे. यातील 18 लोकांनी पहिल्याच महिन्यात पूर्णपणे तंबाखू सोडली आहे.

2787 शाळा झाल्या तंबाखूमुक्त !

शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. तसेच शाळेतही शिक्षक, कर्मचार्‍यांना ते व्यसन नको, शाळेत मुलांमध्ये जनजागृती व्हावी, भविष्यात ते व्यसनी होऊ नये, यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवल्यानंतर शाळेचे घोषणापत्र घेतले जाते. अशाप्रकारे 2787 शाळांनी तंबाखूमुक्त शाळांचे घोषणापत्र दिले. ही संख्या अजूनही वाढती आहे.

काय आहे कोटपा कायदा

शासकीय, निमशासकीय संस्था तंबाखुमुक्त करणे
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी घालणे
शाळा, विद्यालयांजवळ तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी
18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंदी
ई सिगारेट बंदी, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहीरात बंदी

900 व्यसनींकडून पावणेदोन लाखांची वसूली

तंबाखू नियंत्रण कक्ष, पोलिस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या समन्वयातून जिल्ह्यात तंबाखू खाणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, इत्यादी प्रकारे कोटपा कायद्याची पायमल्ली केल्याप्रकरणी एप्रिल ते नोव्हेंबर 2022 पर्यंत 903 लोकांकडून 1 लाख 80 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला.

तपासणी अहवाल

उच्चरक्तदाब ः 2631
मधुमेह ः 2375
दोन्ही आजारः 901

Back to top button