गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : जिल्हयातील 190 शेतकरी कुटुंबियांना आधार | पुढारी

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना : जिल्हयातील 190 शेतकरी कुटुंबियांना आधार

नाशिक : वैभव कातकाडे
शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकर्‍याच्या कुटुंबीयांची काळजी घेऊन त्यांच्या पाठीशी शासन असल्याचा विश्वास देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याच उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ही योजना चांगल्यारीतीने राबविण्यात येत आहे. सन 2021- 22 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 190 शेतकर्‍यांना लाभ मिळाला असून, अद्यापही 51 प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भूमिका बजावत असते. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकरी हे कृषी क्षेत्रात व्यवसाय करत असतात. यामध्ये कार्यरत असताना अनेक अडचणी, आपत्तींना तोंड द्यावे लागत असते. काहीवेळा अपघातामुळे अपंगत्व आल्याने किंवा मृत्यू ओढवल्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. आपत्तीच्या काळात शेतकरी कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2015 मध्ये ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू केली. या योजनेमुळे अपघातग्रस्त कुटुंबीयांना लाभ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. योजनेंतर्गत वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात यांमुळे अनेक शेतकरी दगावतात अथवा त्यांना अपंगत्व येते, त्यांच्यासाठी ही योजना आहे. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 2 लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास (अपंगत्व) 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास (अपंगत्व) 2 लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास (अपंगत्व) 1 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई म्हणून शासनातर्फे देण्यात येत आहे. लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्त कुटुंबीयांनी दावा पत्र, वारस नोंद-उतारा 6 क, शेतकर्‍याचा वयाचा पुरावा, पोलिस प्राथमिक तपास अहवाल किंवा जबाब, बँक पासबुक प्रत, सातबारा उतारा, तलाठी प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, पोलिस स्थळ पंचनामा आणि मृत्यू प्रमाणपत्र इ. कागदपत्रांची पूर्तता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करणे आवश्यक आहे.

2015 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू

कोणाला मिळतो लाभ? 
वीज पडणे,
सर्पदंश, विंचूदंश,
विजेचा शॉक
नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात
रस्त्यावरील अपघातात दगावणे
अपघातात अपंगत्व येणे

तालुकानिहाय शेतकरी असे…
नाशिक 6                 मालेगाव 37
दिंडोरी 10               इगतपुरी 8
त्र्यंबकेश्वर 11           सिन्नर 23
येवला 11                निफाड 17
देवळा 15               चांदवड 15
कळवण 8               सुरगाणा 3
पेठ 4                      एकूण 190

हेही वाचा:

Back to top button