राहुरी : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली ; पाच जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

राहुरी : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली ; पाच जणांवर गुन्हा दाखल

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालूक्यातील सडे गावच्या शिवारात आज पहाटेच्या दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीवर राहुरी पोलिस पथकाने छापा टाकला. यावेळी दोघां जणांना पाठलाग करून पकडले तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत. पकडलेल्या आरोपींकडून विविध प्रकारचे हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.  काल (दि.29) पहाटेच्या दरम्यान काही तरूणांनी टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याचे खबर गुप्त खबर्‍या मार्फत पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानूसार पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नार्‍हेडा, हवालदार एकनाथ आव्हाड, अमोल पडोळे, आजिनाथ पाखरे, सचिन ताजने, पोलिस नाईक अमित राठोड, चालक जालिंदर साखरे आदी पोलिस पथकाने पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास राहुरी तालूक्यातील सडे गावच्या शिवारातील देव नदी अमरधाम जवळ छापा टाकला. त्यावेळी पाच जणांनी टोळी ही अंधारात दबा धरून बसल्याचे दिसून आले.

पोलिस पथकाला पाहताच ते पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग केला. अर्जुन लहू मोरे (वय 21) तसेच नामदेव गोरख बर्डे (वय 35 रा. महादेव वाडी, सडे, ता. राहुरी) या दोघांवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. मात्र यावेळी गोरक्ष सूर्यभान निकम राहणार महादेव वाडी, (सडे, ता. राहुरी) आणि दोन अनोळखी तरूण असे तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत.  पकडलेल्या आरोपींकडून एक चाकू, लोखंडी गज, रस्सी व मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात हवालदार अमोल पडोळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अर्जुन लहू मोरे, नामदेव गोरख बर्डे, गोरक्ष सूर्यभान निकम (तिघे रा. महादेव वाडी, सडे ता. राहुरी) व दोन अनोळखी इसम अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक चारूदत्त खोंडे हे करीत आहेत.

अनेक गुन्हे उकल होण्याची शक्यता

गेल्या काही महिन्यांपासून राहुरी परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले होते. याबाबत काही गुन्हेही दाखल झालेले आहेत. त्याचा तपास पोलिस घेत आहेत. याच गुन्ह्यांचा तापस घेत असताना पोलिसांना काही जण संशयितरीत्या फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी लागलीच या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच या संशयितांनी पळ काढला. परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोघांना गजाआड केले. या दोघांना पोलिसांनी पकडल्याने अनेक गुन्हे उकल होण्याची शक्यता आहे.

Back to top button