

नगर : पुढारी वृत्तसेवा : दलित, आदिवासी, पारधी, भटके, विमुुक्त समाजाने निवास व शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनीवरुन त्यांना हटविण्यासाठी सुरु असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आदिवासी पारधी संघटना व मानवी हक्क अभियानाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी जोरदार निदर्शने करुन शासन-प्रशासनाविरोधात बोंबा मारल्या. मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराज, वाडियापार्क येथील महात्मा गांधी तर माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चास प्रारंभ झाला.
या मोर्चात आदिवासी पारधी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष मच्छिंद्र गवाले, पारधी संघटनेचे उपाध्यक्ष विजय काळे, महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पवार, जिल्हाध्यक्ष अजित भोसले, संदीप चव्हाण, अक्षय भोसले यांच्यासह दलित, आदिवासी, पारधी, भटके, विमुक्त समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वसंत टॉकीज, हातमपुरा, जुने जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
शासकीय गायरान व वन जमिनीवर निवासी व शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमाकुल करून 7/12 वर त्यांचे नाव लावावे, न्यायालयाच्या आदेशान्वये अतिक्रमण हटविण्यापूर्वी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या आदेशा अगोदर शासनाने वेळोवेळी जमीन नावे करण्याबाबतचे काढलेल्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.