FIFA World Cup 2022 : रोनाल्डोची जादू कायम! पोर्तुगालचा उरूग्वेवर दणदणीत विजय; राऊंड ऑफ १६ मध्ये धडक | पुढारी

FIFA World Cup 2022 : रोनाल्डोची जादू कायम! पोर्तुगालचा उरूग्वेवर दणदणीत विजय; राऊंड ऑफ १६ मध्ये धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालची नेत्रदिपक कामगिरी कायम आहे. सोमवारी रात्री उशीरा लुसैल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पोर्तुगालने उरूग्वेवर २-० ने विजय मिळवला. या विजयाने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या टीमने राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला. याआधी फ्रान्स आणि ब्राझीलनेही राऊंड ऑफ १६ मध्ये धडक मारली आहे. या विजयाचे नायक ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि ब्रूनो फर्नांडीस ठरले, त्यांनी प्रत्येकी एक गोल करत विजय खेचून आणला.

पोर्तुगालचा दोन सामन्यांमधील हा दुसरा विजय आहे. त्यामुळे तो सहा गुणांसह अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे घानाचा संघ तीन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच साउथ कोरिया आणि उरूग्वे प्रत्येकी एक गुणासह तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहे. उरूग्वेला दुसऱ्या स्थानी पोहचण्यासाठी घानावर मात करणे गरजेचे आहे.

सोमवारी झालेला पोर्तुगाल वि. उरूग्वे सामना पहिल्या हाफमध्ये ०-० असा बरोबरीत राहिला. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी कडवी झुंज सुरू होती. उत्तरार्धात पोर्तुगालने नव्या दमाने सुरुवात केली. परिणामी, या हाफच्या पहिल्या १० मिनिटांतच पोर्तुगीज संघाने एक गोल केला. सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला रोनाल्डोच्या प्रयत्नांना यश आले. ब्रुनो फर्नांडिसने राफेल गुरेरोच्या क्रॉसवर हेड केले. मात्र, बॉलला शेवटचा टच रोनाल्डोने केला. मात्र या गोलची नोंद ब्रुनो फर्नांडिसच्या खात्यात झाली. १-० अशा पिछाडीवर पडल्यानंतर उरुग्वेने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण पोर्तुगीजची बचाव फळी भेदता आला नाही. रिव्हर्स इंज्युरी टाइममध्ये ९३ व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडिसने पेनल्टीद्वारे दुसरा गोल केला.

असे झाले गोल…

54 दुसर्‍या हाफमध्ये 54 व्या मिनिटाला ब्रूनो फर्नांडिसने डाव्या बगलेतून क्रिस्टियानो रोनाल्डोला टाकलेला क्रॉस गोलपोस्टमध्ये गेला. प्रथमदर्शनी हा गोल रोनाल्डोने हेडद्वारे नोंदवला असे वाटत होते. पण ब्रूनोने दिलेला क्रॉस रोनाल्डो आणि उरुग्वेचा गोलकीपर या दोघांनाही चकवत गोल पोस्टमध्ये गेला.
90+3 सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत मोठ्या डी मध्ये उरुग्वेच्या बचावपटूचा हँड झाल्यामुळे पोर्तुगालला पेनल्टी देण्यात आली. या पेनल्टीवर ब्रूनो फर्नांडिसने स्वतःचा आणि संघाचा दुसरा गोल करत पोर्तुगालचा विजय निश्चित केला.

पहिल्या हाफमध्ये 70% पझेशन स्वतःकडे ठेवत पोर्तुगालने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. तरीसुद्धा सामन्याच्या 32 व्या मिनिटाला उरुग्वेला मिळालेली चांगली संधी पोर्तुगीज गोलकीपर दिएगो कोस्टाच्या उत्कृष्ट बचावामुळे वाया गेली.

हेही वाचा :

Back to top button