नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राजकीय पक्षांना बाजूला सारत शहरातील सकल हिंदू संघटनांनी एकत्रित येत आयोजित केलेला माेर्चा, त्याला मिळालेले अभूतपूर्व यश आणि मोर्चाच्या वेळी हिंदू बांधवांची शिस्तबद्धता यावरून नाशिकचा माेर्चा राज्यासाठी लक्षवेधी ठरला.
श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पुनावालाला फाशी द्यावी आणि लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तयार करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे सोमवारी (दि.२८) नाशिकमधून मोर्चा काढण्यात आला. या अभूतपूर्व मोर्चाला हिंदू बांधवांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता त्याचे आयोजन यशस्वी ठरल्याची सर्वत्र रंगली आहे. मात्र, मोर्चाच्या आयोजनामागे कार्यरत २२ जणांच्या टीमने गेल्या पंधरा दिवसांपासून घेतलेल्या दिवस-रात्र मेहनतीमुळे हे शक्य झाले.
नाशिक शहरातील सहाही विभागांत गेल्या १५ दिवसांमध्ये १२५ च्या वर बैठका पार पडल्या. तसेच प्रत्येक बैठकीला सुमारे दोनशे ते तीनशे नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. या बैठकांमध्ये मोर्चाचा मार्ग, मोर्चात सहभागी महिला, राजकीय नेते, साधू-महंत व नागरिकांचा क्रम ठरविण्यापासून ते न्याय्यहक्क मागण्यांवर एकमत करण्यात आले. तसेच (माेर्चाच्या संदर्भातील फलकही शहर-परिसरात उभारण्यात आले. आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर सोमवारी शहरातून निघालेल्या मोर्चाला अभूतपूर्व यश आले आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या या शिस्तबद्ध आणि लक्षवेधी मोर्चाचा राज्यभरात डंका वाजत आहे.