दिघंची; शिवानंद क्षीरसागर : दिघंची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून वातावरण तापले आहे. येथे राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात चुरशीने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरपंचपद आरक्षण महिला सर्वसाधारण असे आहे. यामुळे चुरस वाढली आहे.
गतवेळी शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार अनिल बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाची सत्ता होती. त्यामुळे सरपंच अमोल मोरे यांनी भाजप व राष्ट्रवादीसह सत्ता काबीज केली होती. सरपंच मोरे यांनी आमदार बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून दिघंची भागात विविध विकास कामे केली आहेत. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. माधुरी अमोल मोरे यांना सरपंच पदाच्या उमेदवारी देऊन ते रिंगणात उतरवणार आहेत.
भाजपचा मोठा राजकीय गट दिघंचीत आहे. तसेच माजी आमदार राजेंद्र देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख या दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नेत्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बारकाईने लक्ष दिले आहे.
गेल्यावेळी भाजपचे 5 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते. युवा नेते गतवेळचे सरपंचपदाचे उमेदवार अमोल काटकर यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यावेळी सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार राजकीय फिल्डिंग लावली आहे. मात्र यावेळी खुल्या प्रवर्गातील महिलेस संधी न देता इतर मागास प्रवर्गातील सौ. वैशाली प्रशांत शिंदे (भाळवणकर) यांची उमेदवारी जवळ निश्चित करून अल्पसंख्यांक माळी समाजातील महिलेस संधी देऊन प्रयोग केला आहे. हा प्रयोग जनतेला कितपत रुचणार तसेच संपूर्ण अल्पसंख्यांक वर्ग हा बदल स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांचा स्वतंत्र गट आहे. देशमुख यांचे वडील कै. धोंडीसाहेब देशमुख यांची ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष सत्ता होती. त्यानंतर हणमंतराव देशमुख यांचीही गत वर्षाची निवडणूक वगळता गेली अनेक वर्षे ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता राखली होती. मात्र 2017 मध्ये त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. चुका दुरुस्त करून ते पुन्हा जोमाने कामाला लागले आहे. त्यांच्याकडे एकमुखी नेतृत्व असल्याने शिवाय अंतर्गत गटबाजी नसल्याने त्यांना स्थनिक राजकीय निर्णय घेणे सोपे झाले आहे. हणमंतराव देशमुख आपल्या पत्नी सौ. जयमाला हणमंतराव देशमुख यांना सरपंचपदासाठी रिंगणात उतरवणार आहेत. सौ. जयमला देशमुख या सन 2007 मध्ये दिघंची पंचायत समितीच्या गणातून निवडून आल्या होत्या, शिवाय आटपाडी पंचायत समितीच्या सभापती ही होत्या. त्यामुळे त्या राजकारणात त्या नवख्या नाहीत. शिवाय त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. महिलांसाठी त्यांनी विविध उपक्रम घेऊन त्यांनी महिलांची संपर्क साधला आहे.
राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट) व भाजप यासह चौथी आघाडी स्थापण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या तिन्ही पक्षांतील नाराज मंडळींना एकत्र करून एक वेगळा तसेच विकासाच्या मुद्द्यावर व भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत या मुद्द्यावर वेगळा ठेवण्यासाठी येथील काँग्रेस नेते अॅड. विलासराव देशमुख यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या पत्नी सौ. हेमलता विलासराव देशमुख यांना चौथ्या आघाडीकडून सरपंचपदाच्या उमेदवारासाठी रिंगणात उतरवण्याच्या हालचाली आहेत.
दिघंची ग्रामपंचायत ही राजकीयदृष्ट्या तालुक्यात प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. दिघंचीच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविणार असल्याचे सर्व पक्षांनी सांगितले असले तरी दिघंचीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन बिनविरोध ग्रामपंचायत करावी व दिघंचीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे, अशीही मागणी होत आहे.
हेही वाचा