मोटार अ‍ॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय? | पुढारी

मोटार अ‍ॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय?

सध्याच्या चारचाकी गाड्या एकाहून एक आकर्षक लूकमध्ये पाहावयास मिळतात. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि ट्रेंडनुसार गाडीच्या रचनेत वेळोवेळी बदल केला जातो. गाडीची रचना आणि आखणी ही ऑटोमोबाईल इंजिनिअरकडून केली जाते तर अंतर्गत आणि बहिर्गत डिझायनिंग करण्याचे काम हे मोटार अ‍ॅक्सेसरीज डिझायनर याचे असते. करिअर म्हणून या क्षेत्राची माहिती खूपच कमी लोकांना आहे. मात्र हे क्रिएटिव्ह करिअर आहे आणि या क्षेत्रात पुढे जाण्याची विपूल संधी आहे.

अ‍ॅक्सेसरीज डिझायनिंग हे ऑटोमोबाईल डिझायनरच्या कामाचा भाग आहे. पण हे केवळ मोटार आणि त्याच्या सामानापुरतेच मर्यादित आहे. कार अ‍ॅक्सेसरीज डिझायनर हे नव्या प्रकारच्या आणि अनोख्या पद्धतीने मोटारीचे एक्स्टर्नल आणि इंटिरियर डिझाईन व स्पेअर पार्टची रचना करत असतात. या आधारावर ते केवळ मोटारीची सुरक्षितता राखत नाही तर त्याची कार्यक्षमता वाढीसाठीदेखील मदत करतात. अशावेळी मोटार अ‍ॅक्सेसरीज डिझायनरला वाहनाची सुरक्षा देखील लक्षात घ्यावी लागते आणि ठरवलेल्या निकषानुसार त्याची रचना केली पाहिजे.

मोटार अ‍ॅक्सेसरीज डिझायनरला तीन क्षेत्रात काम करता येते. इंटिरियर डिझायनिंग, एक्सटिरियर डिझायनिंग किंवा कलर आणि ट्रिम डिझाईन. ते ड्रायव्हिंग मॉडेल आणि प्रोटोटाईपचा उपयोग करत मोटारीचे अ‍ॅक्सेसरीजचे पार्टस्, असेब्ली आणि सिस्टीमचा आराखडा तयार करतात. मोटारीचा कच्चा आराखडा तयार करून त्यानुसार डिझायनिंग करणे हे प्रामुख्याने कार डिझायनरचे काम आहे.

एक मोटार अ‍ॅक्सेसरीज डिझायनरला हायड्रोलिक, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल सिस्टीमची माहिती असणे गरजेचे आहे. याशिवाय ग्राहकाची संपूर्ण गरज भागेल अशा रीतीने रचना करणे आणि त्याचा उपयोग कसा करता येईल, याचा विचार डिझायनरला करावा लागतो. म्हणूनच डिझायनरच्या अंगी कल्पकता असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संगणक आणि मोटारीचे तंत्रज्ञान अवगत असणे आवश्यक असते आणि त्यांचे काम अधिक सुलभ होते.

मोटार अ‍ॅक्सेसरीज डिझायनर होताना त्याचे प्राथमिक ज्ञान मिळवण्यासाठी किमान पदवी असणे गरजेचे आहे. बॅचलर ऑफ डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, बीएस्सी इन डिझाईन, बी डीएस इन ऑटोमेटिव्ह डिझाईन यांसारख्या अभ्यासक्रमाच्या मदतीने आपण या क्षेत्रात पाऊल टाकू शकता. ज्या कॉलेज आणि विद्यापीठातून पदवी घेणार आहात, त्यास विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असणे मात्र आवश्यक आहे.

संस्था

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी,नवी मुंबई. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद. एरिना अ‍ॅनिमेशन, बंगळूर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, दिल्ली.

मेघना ठक्कर

Back to top button