दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष... | पुढारी

दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष...

प्रासंगिक – मनोज काळे

जेजुरीनंतरची उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा, अशी ख्याती असलेल्या ओझरचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदाचा हा पहिलाच यात्रोत्सव असल्याने भाविकांसोबतच ओझरकरदेखील यात्रा धूमधडाक्यात साजरी करणार आहे. ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सव मंगळवारी (दि. 29) सुरू होत आहे. पाच दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे अश्व हा बारागाडे ओढतो आणि चालत्या-फिरत्या गाड्यांवर फिरणार्‍या सोंडग्यांवर पिळदार चमचमणारे शरीर असलेले मल्हार मल्ल कसरती करतात. भंडारा आणि खोबर्‍याच्या उधळणीने परिसर सोनेरी होऊन जातो. 200-250 वर्षांची परंपरा पाहण्यासाठी ओझर परिसरातील 40 वाड्या-वस्त्यांचे ग्रामस्थ हे दृश्य डोळ्यांत साठवून खंडेरावाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावतात.

नगर परिषद कर्मचारी हे यात्रा मैदानात जेसीबीचा वापर करत बारागाडे ओढण्यासाठी मैदान तयार करत आहेत. मानकरी आपापल्या गाड्यांची रंगरंगोटी व सजावट करत आहेत. यात्रोत्सवात चक्रीपासून रहाटपाळणा ते भूलभुलय्या, मौत का कुआँ आदी मनोरंजनात्मक खेळांसाठी व अनेक दुकानदारांसाठी योग्य जागा मिळावी, यासाठी नगर परिषद, कर्मचारी, यात्रा कमिटी यात्रेच्या 15 दिवस आधी परिश्रम घेऊन नियोजन करत आहेत. जागावाटपाच्या जाचक अटी काढून निविदा पारदर्शक पद्धतीने म्हणजे ऑनलाइन पद्धतीने काढाव्यात, अशी मागणी दीपक डोके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याने नगर परिषदेने काढलेल्या निविदाबाबत जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे जागा घेणार्‍यांचे लक्ष लागून आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील नामवंत तमाशा मंडळे आपली कला सादर करतात, तर दुसर्‍या दिवशी मंदिर परिसरात याच तमाशा मंडळाच्या हजेरीचा कार्यक्रम होतो. माजी आमदार अनिल कदम, यतीन कदम, मर्चंटचे चेअरमन राजेंद्र शिंदे, यात्रा कमिटी अध्यक्ष धनंजय पगार, खजिनदार प्रशांत चौरे, सहखजिनदार अशोक शेलार, शिवाजी शेजवळ, कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, सतीश पगार, परशराम शेलार, संजय भडके आदींसह बारागाडे मानकरी व ग्रामस्थ नियोजनात व्यस्त आहेत. यात्रेवर नियंत्रणासाठी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 90 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यात पोलिस मुख्यालयाचे 40 कर्मचारी, जिल्हा वाहतूक शाखेचे 20 कर्मचारी, वाडीवर्‍हे, पिंपळगाव बसवंत, घोटी, इगतपुरी पोलिस ठाण्यातून 44 कर्मचारी तसेच दंगा नियंत्रण पथक असा बंदोबस्त पोलिस ठाण्यामार्फत करण्यात आलेला आहे.

असे असतात बारागाडे…
मानाचा गाडा (पगार कुटुंब), पगार गवळी, मधला माळीवाडा, वरचा माळीवाडा, क्षत्रिय मराठा समाज, कदम मराठा, शेजवळवाडी, सोनेवाडी, भडके वस्ती, सावतानगर, शिंदे मळा, अण्णा भडके यांची बैलगाडी.

हेही वाचा:

Back to top button