पुणे-कोलाड महामार्गावरील खड्डे बुजविले | पुढारी

पुणे-कोलाड महामार्गावरील खड्डे बुजविले

बावधन : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-कोलाड महामार्गावर भूगाव येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. याबाबत दैनिक पुढारीने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने या मार्गावरील खड्डे बुजविले आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.  भूगाव परिसरात कोलाड मार्गावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागत होत्या. ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच वनिता तांगडे, कालिदास शेडगे यांनी प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते.

तसेच ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. खासदार सुप्रिया सुळे या मुळशी तालुक्याच्या दौर्‍यावर आल्यानंतर माजी उपसरपंच अक्षय सातपुते व जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महामार्गाची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले होते. त्यानंतर सुळे यांनी महामार्गाची पाहणी करून महामार्ग प्रधिकरणाला रस्ता दुरुस्त करण्यास सांगितले होते. या समस्येबाबत दैनिक पुढारीने आवाज उठविला होता. या सर्वांची दखल घेत महामार्ग प्रशासनाने तत्परता दाखवत रस्त्याची दुरुस्ती केली आहे. तसेच गावठाण भागातील खड्डे बुजवून दिले. या वेळी सरपंच वनिता तांगडे, उपसरपंच कालिदास शेडगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button