मृत्यूनंतरही 'ती'च्या वेदना.. | पुढारी

मृत्यूनंतरही 'ती'च्या वेदना..

नाशिक (निमित्त) राहुल पगारे

येथील ग्रामीण रुग्णालयात २१ तारखेला सकाळी ज्योती दळवी या गरोदर मातेने गोंडस बाळाला सुखरूप जन्म दिला. मात्र, जन्माला पाच तास उलटत नाहीत, तोच नवजात शिशु आईच्या दुधाला कायमच पोरके झाले. मृत्यू नंतरही ‘ती’च्या वेदना मात्र संपल्या नाहीत. तब्बल 29 तासांनंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अपुऱ्या उपचारामुळे मातेने जीव गमावला अन् आजूबाजूच्या व्यग्र गर्दीला काही तासांनी का होईना जाग आली. दोषारोप सुरू झाले. कोणी आंदोलनाची भाषा करू लागले… या सगळ्यांत ‘ती’चा मृतदेह मात्र रात्रभर शवविच्छेदन कक्षात पडून होता. दुसरीकडे आईच्या दुधासाठी भुकेने व्याकूळ झालेल्या तान्हुल्याचा रडण्याचा आवाजही येऊ नये एवढे ते भुकेने थकले होते. सकाळ झाली, मृतदेह घेऊन कुटुंबीय पाड्यावर (गावी) गेले. अंत्यविधीसाठी सगळी तयारी झाली होती… सरणही रचले… मृतदेह स्मशानात नेला… काही मिनिटांत अग्निडाग देणार तोच… कर्तव्यदक्ष शासकीय यंत्रणा धावत स्मशानात हजर झाली अन् मृतदेह घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन गेली. कारण शवविच्छेदनातून मृत्यूची कारणे शोधायची होती. खरीच सापडतील तिच्या मृत्यूची खरी कारणे?… कोणी म्हणेल हा मृत्यू वैद्यकीय असुविधांमुळे झाला असेल, कोणी म्हणेल हा हलगर्जीपणा… खरे तर ही फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपाची घटना आहे. अशा कित्येक माता-बालकांना जन्म देता-घेता या मरणयातनांतून जावे लागत आहे. लहानसा पाडा ते प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा तेथून ग्रामीण रुग्णालय… येथून शेवटी जीव वाचला, तर जिल्हा रुग्णालय… हा ‘रेफर’ संस्कृतीचा प्रवास अविरत सुरूच आहे.

गरोदर मातांच्या तपासणीत सोनोग्राफी तपासणी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा! कित्येक महिलांना येथे हा खर्चदेखील परवडत नाही म्हणून ती तपासणी टाळतानाची उदाहरणे दिसत असतानाच, खिशातून पैसे देऊन सोनोग्राफी तरी करून घ्या, असे म्हणणारे वैद्यकीय अधिकारीही याच व्यवस्थेत दिसून आले आहेत. पेठ तालुक्यात अशिक्षित महिलांचे प्रमाण मोठे आहे. आरोग्याच्या समस्या मांडण्याविषयीचा लाजरेपणा, अज्ञान यामुळे अशा महिला निदान महिला स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलताना तरी संकोचणार नाहीत. पण येथे तर वर्षानुवर्षे स्त्रीरोगतज्ज्ञाची जागा रिक्तच!

उपजिल्हा रुग्णालयाची मागणी कित्येक वर्षांपासून फायलींमध्ये अडकून पडली आहे. जिल्हा रुग्णालयातही प्रसूत होणाऱ्या महिलांची अवस्था काही वेगळी नाही. एका खाटेवर दोन प्रसूत मातांना दिवस काढावे लागतात. आमच्या आदिवासी महिला रुग्ण व सोबतच्या नातलगांची अवहेलना तर नि:शब्द करणारी. जिल्हा रुग्णालयातील प्रचंड ताण बघता, जिल्ह्याला स्वतंत्र स्त्री रुग्णालय असावे, अशी मागणीसुद्ध होत नाही हेच नवल!

अशा कितीतरी ‘ज्योती’ आपल्या नवजात बालकांना मातृत्वाचा प्रकाश देण्याआधीच विझून जात आहेत. मृत्यूनंतर अवहेलना भोगणाऱ्या ज्योतीच्या शवविच्छेदनातून मृत्यूचे शारीरिक कारण उजेडात येईलही… मात्र या व अशा अनेक मृत्यूला कारणीभूत सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थेतील अनेक कारणेसुद्धा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत. देशभरात ‘जन-जातीचा’ गौरव होत आहे. मात्र, पेठसारख्या आदिवासी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थाच आजारी पडलीय. तिच्यावर वेळीच उपचार झाले नाही, तर गलथान व्यवस्थेत अशा ‘ज्योती’ मृत्यूच्या अग्नीत जळतच राहतील एवढे निश्चित… मात्र तेव्हा तो आकस्मिक मृत्यू न राहता व्यवस्थेने केलेला ‘खून’ ठरेल!

हेही वाचा:

Back to top button