नाशिक : काही अनाथगृहांमध्ये बालकांच्या शोषणाची चर्चा | पुढारी

नाशिक : काही अनाथगृहांमध्ये बालकांच्या शोषणाची चर्चा

नाशिक : नितीन रणशूर
पंचवटी परिसरातील एका अनाथगृहात संचालकानेच बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्यातील काही अनाथगृहांमध्येदेखील मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याची चर्चा दबक्या सुरात सुरू झाली आहे. या अनाथगृहांमध्ये येणारी अनेक मुले पूर्णपणे निराधार तर काही खूपच गरीब घरातील असल्याने यंत्रणेकडे तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे शासकीय यंत्रणेनेच यात पुढाकार घेऊन या चर्चेतील सत्यता पडताळावी आणि दोषींना समोर आणत खरोखरच उदात्त उद्देशाने अनाथगृहे चालवणार्‍या संस्थांनाही न्याय द्यावा, अशी मागणी संवेदनशील नागरिकांकडून केली जात आहे. यंत्रणेने याबाबत पावले उचलली तर दोन दिवसांपूर्वी उघड झालेल्या विकृत प्रकाराप्रमाणे आणखी काही गोष्टी समोर येतील. तसेच, यात बळी पडणार्‍या मुलांमध्येही तक्रार करण्याचे धाडस येईल, असे बोलले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतामध्ये जगातल्या सर्वाधिक लैंगिक शोषित मुलांची संख्या आहे. प्रत्येक 155 मिनिटांना 16 वर्षांच्या आतील बालकावर अत्याचार होतो, तर दररोज बाललैंगिक शोषणाचा एक तरी गुन्हा नोंदवला जातो. लहान मुलांच्या असहायतेचा आणि दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण केले जाते. ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ या उक्तीला छेद देणार्‍या घटना काही अनाथालय-निवारा बालगृहांमध्ये घडत असल्याचे बोलले जाते. विशेषत:, काही बेकायदा निवारा बालगृहांकडे संशयाची सुई वळली आहे. लहान बालकांना कुरवाळणे, मुलांसोबत अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे. तसेच मोबाइल किंवा इतर माध्यमांतून मुलांना अश्लील साहित्य दाखवणे, मुलांशी लैंगिक भाषेत बोलणे तसेच बालके अंघोळ करत असताना किंवा कपडे बदलत असताना वाईट नजरेने पाहण्यासह त्याचे व्हिडिओ करणे, धमकावून लैंगिक संबंध ठेवणे यासारखी लाजिरवाणे अपकृत्ये लैंगिक शोषण या प्रकारात मोडतात. अश्लील, अनैसर्गिक कृत्य केल्यावर ते कोणाला सांगू नये, यासाठी बालकांना मारहाणही केली जात असल्याची चर्चा आहेे. 10 ते 15 वर्षे वयोगटातील ही कोवळी मुले घाबरून गप्प बसत असल्याने बर्‍याचदा या गुन्ह्यांची नोंददेखील होत नाही. या बालगृहांशी संबंध येणार्‍या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, काही बालगृहातील बालकांना संस्थाचालकांसह अन्य व्यक्तींच्या घरी धुणी-भांडी यांसारखी कामे करण्यासही पाठविले जाते. काही बालकांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते. त्यातून मिळणार्‍या पैशांवर ही बालगृहे पोसली जातात. अनेकदा बालकांमधील गुण हेरून या वेगवेगळ्या प्रकारच्या कला देणगीदारांसमोर सादर करण्यास त्यांना सांगितले जाते. विविध गुन्ह्यांत ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन बालकांची अनाथ व निराधार मुलांचे संगोपन केंद्र तसेच शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहात रवानगी करण्यात येते. त्यांच्यासोबत अनाथ आणि निराधार मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात येते. या विधिसंघर्षित बालकांकडूनही अनाथ आणि निराधार बालके लक्ष्य होत असल्याची चर्चा आहे.

रॅकेट सक्रिय झाल्याचा संशय…
शासकीय अनुदान न घेता देणग्यांवर बालगृह चालविणे मोठे दिव्यच आहे, तरीदेखील बालगृहांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मान्यता नसलेल्या निवारा बालगृहात लैंगिकशोषणाचे रॅकेट सक्रिय झाल्याचे बोलले जाते. त्या माध्यमातून रॅकेटमधील संबंधित व्यक्ती पैसा उभारून ऐषोआरामाचे जीवन जगत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा:

Back to top button