सोनई : बालविवाह लावल्याने 7 जणांविरुद्ध गुन्हा | पुढारी

सोनई : बालविवाह लावल्याने 7 जणांविरुद्ध गुन्हा

सोनई : पुढारी वृत्तसेवा :   शिंगणापूर (ता. नेवासा) येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्यावरून दोन्ही कुटुंबातील सात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शिंगणापूर घोडेगाव रस्त्यावरील वस्तीवर विवाह होत असल्याची माहिती शिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना मिळाली. यावरून त्यांनी ग्रामसेवक व पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याबद्दल सात जणांवर गुन्हा दाखल केला.

याबाबत शिंगणापूरचे ग्रामसेवक दादासाहेब नारायण बोरुडे यांनी फिर्याद दिली. यात त्यांनी म्हंटले की, गुरुवारी (दि. 24) दुपारी एक वाजता मुलगी 18 वर्ष वयापेक्षा कमी असल्याचे माहित असूनही विवाह लावला असल्यावरून लहू बाळासाहेब कल्हापुरे, बाळासाहेब धोंडीराम कल्हापुरे व उषाबाई बाळासाहेब कल्हापुरे, (तिघे रा. खडांबे), ज्ञानदेव निवृत्ती काळे, सुरेखा ज्ञानदेव काळे (रा. शिंगणापूर), बाबासाहेब सखाहारी जाधव (रा. बोधेगाव), वैभव बाळासाहेब शुक्रे (रा. वांजोळी) यांच्यावर शिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Back to top button