नाशिकरोडला कोयते धारी टोळक्याची दहशत, वडापाव विक्रेत्यावर हल्ला | पुढारी

नाशिकरोडला कोयते धारी टोळक्याची दहशत, वडापाव विक्रेत्यावर हल्ला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जुन्या भांडणाची कुरापत काढून नाशिक रोड परिसरातील टिळकपथ वर असलेल्या एका वडापाव विक्रेत्यावर कोयतेधारी टोळक्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. तत्पूर्वी याच टोळक्याने देवळाली गाव येथील बाबू गेनू रोडवर हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करून आजूबाजूच्या घरावर दगडफेक केली व एका चार चाकी वाहनाची तोडफोड केली या घटनेप्रकरणी नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते परिणामी पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिसरात शांतता निर्माण झाली.

यासंदर्भात विशाल गणपत गोसावी राहणार धनगर गल्ली देवळाली गाव नाशिक रोड या युवकाचा टिळक पथ येथे वडापाव विक्रीचा गाडा आहे. नेहमीप्रमाणे विशाल व त्याचे कामगार ग्राहकांना वडापाव देत असताना अचानकपणे मयूर जानराव, तुषार जाधव, कमलेश जानराव, दिनेश खरे, मोगल दाणी सर्व राहणार भीम नगर जेल रोड नाशिकरोड यांनी हातात कोयते व रामपुरी चाकू घेऊन दहशत निर्माण केली. फिर्यादीचे नातेवाईक तेजस गिरी यांच्या सोबत झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून संबंधित टोळक्याने हल्ला करून दहशत निर्माण केल्यानंतर वडापाव विक्रेते विशाल गोसावी यांच्यावर कोयत्याने हल्ला करून जखमी केले. दरम्यान या घटनेनंतर परिसरात घबराट निर्माण होऊन तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ही घटना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, पोलीस उपनिरीक्षक काकड यांना समजताच ते व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी हे टोळके फरार झाले होते. पोलिसांनी तातडीने शांतता निर्माण केली. दरम्यान विशाल गोसावी यांच्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच देवळाली गाव येथेही संबंधित टोळक्याने दहशत निर्माण केली यासंदर्भात बाळू खेलुकर राहणार बाबू गेनू रोड देवळाली गाव नाशिकरोड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, पुतण्या संदेश याचे काही वेळापूर्वी भांडण झाले होते त्या भांडणाची कुरापत काढून मयूर जानराव, तुषार जाधव, रोहित नवगिरे व त्याचे दोन ते तीन साथीदार यांनी बाबू गेनू रोड येथे येऊन हातात तलवारी व कोयते घेऊन दहशत निर्माण केली. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या घरावर दगडफेक केली तसेच टोयाटो वाहन क्रमांक एम एच 43 टी 2345 या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर हे टोळके फरार झाले असेही खेलुकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान ही घटना उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांना समजताच ते व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे देवळाली गाव व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वडापाव विक्रेत्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस संबंधित आरोपींचा शोध घेत आहे.

हेही वाचा :

Back to top button