

सुरेश भुजबळ
बेल्हे : केवळ 25 किलोमीटरपर्यंत रुग्णवाहिकेने रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यायचे असेल तर छोट्या गाडीसाठी 500 रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर गाडीसाठी 700 रुपयेच आकारण्यात यावेत, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. असे असले तरी आळेफाटा येथे प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. संकटकाळात रुग्णांच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने वसुली केली जात असल्याचे आणखी एक धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. आळेफाटा येथे रुग्णवाहिकांकडून होत असलेल्या अव्वाच्या सव्वा वसुलीला नक्की कोणाचा आशीर्वाद आहे हा प्रश्नच आहे. यावर परिवहन विभागाचे नियंत्रण नसल्याचे रुग्णसेवेतील एक दाहक वास्तव पुढे आले आहे.
हॅलो, : माझ्या नातेवाइकाला आळेफाटा येथील एका रुग्णालयातून दुसर्या एका रुग्णालयात रुग्णवाहिकेने न्यायचे आहे, किती रुपये घ्याल?" असा प्रश्न दै. 'पुढारी' प्रतिनिधीने आळेफाटा येथील काही रुग्णवाहिकेची सेवा देणार्याला केला. रुग्ण आहे की नाही, याची खात्री संबंधित रुग्णवाहिका चालकाने करून घेतल्यानंतर त्या रुग्णवाहिका चालकाने त्यांचे दरपत्रकच सादर केले. बोलेरो गाडीचे 2 हजार रुपये लागतील. रुग्णाला ऑक्सिजन लागेल तर 800 अधिक लागतील आणि रुग्ण गंभीर असेल तरी आम्ही घेऊन जातो. मात्र, त्यासाठी साडेपाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी माहिती या रुग्णवाहिका चालकाने दिली.
शासनाच्या दरपत्रकापेक्षा कितीतरी अधिक दर असल्याने या प्रतिनिधीने दुसर्या रुग्णवाहिका सेवा पुरविणार्यांशी संपर्क साधला. त्यांनाही तोच प्रश्न केल्यानंतर त्याने मारुती गाडीचे 1 हजार रुपये सांगितले. दर जास्त होतात, असे म्हटल्यानंतर त्याने जे पुढे सांगितले, त्याने धक्काच बसला. "साहब मै पहले 800 रुपये लेता था, मगर अब 1 हजार कर दिया है, मै तो सिर्फ 1 हजार लेता हूं, मगर अब लोगो की जरुरत है ना, तो सबके रेट बढ गये है, सस्ते में कुछ नही मिलेगा". रुग्णवाहिका पुरविणार्याच्या या संभाषणावरून रुग्णवाहिकेचा कसा बाजार झाला आहे, याचे दाहक वास्तव पुढे आले.
एक मोबाईल कॉल करा 500 रुपये मिळवा
पुणे-नाशिक, कल्याण-अहमदनगर महामार्गावर अपघात झालेला दिसला की, रुग्णालयाच्या रुग्णवाहिका बोलविण्यासाठी मोबाईलवरून फोन करा. रुग्णवाहिका येउन रुग्ण उचलेपर्यंत थांबा. रुग्णवाहिकेचा चालक तुम्हाला शोधत 500 रुपये रोख देईल. ते पैसे रुग्णालयात बिलात रुग्णाच्या नातेवाईकांकडून घेतले जातात, असा भयानक प्रकार येथे सुरू आहे.
आपत्कालीन स्थितीचा उचलला जातो लाभ
आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकेची गरज भासते. अशावेळी कुणी भाव करत नाही. आपल्या व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे, यासाठी तो धडपडत असतो. याच स्थितीचा फायदा रुग्णवाहिकाचालक उचलत आहेत.