नाशिकच्या 'मिलिटरी गर्ल' अनंतात विलीन, नागरिकांना अश्रू अनावर | पुढारी

नाशिकच्या 'मिलिटरी गर्ल' अनंतात विलीन, नागरिकांना अश्रू अनावर

नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी असलेल्या सीमा सुरक्षा दलातील पहिल्या महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव अनंतात विलीन झाल्या. याप्रसंगी उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले. निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सजवलेल्या रथात त्यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘अमर रहे, अमर रहे गायत्री जाधव अमर रहे’ व ‘भारत माता की जय’ या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. गावातून अंत्ययात्रा ग्रामपंचायत प्रांगणात आणल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सलामी दिली. अंत्यदर्शनाप्रसंगी आई, वडील व बहिणींसह नातेवाइकांचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांचे मन हेलावले. यावेळी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत गायत्री यांच्या मामाचा मुलगा हृषिकेश कोकणे याने अग्निडाग दिला.

गायत्रीने लासलगाव महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले आहे. त्यानंतर लासलगाव येथील पार्थ अकॅडमी येथे ट्रेनिंग घेतले. स्टाफ सिलेक्शनमध्ये सीमा सुरक्षा दलात दि.२१ मार्च २१ रोजी अलवर राज्यस्थान येथे ट्रेनिंगसाठी तिची निवड झाली. राज्यस्थानमध्ये ट्रेनिंग पूर्णत्वास जात असताना तिचा खड्ड्यात पडून अपघात झाला. त्यानंतर अलवर राज्यस्थान येथे मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली व परत ट्रेनिंगला रुजू झाली. परंतु पुन्हा त्रास जाणवू लागल्याने एसएमएस हॉस्पिटल जयपूरला पुन्हा मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली व ती पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर दि.३० मार्च २२ रोजी एसएसबी बथनाहा जिल्हा अररिया बिहार येथे नेपाळ सीमेवर तिची नियुक्ती झाली. मात्र, रुजू झाल्यानंतर तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन घरी आली. त्यानंतर नाशिक येथील दोन खासगी रुग्णालयांत उपचार केल्यानंतर दि.१ जून रोजी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल केले. तेथे तीन महिने उपचार घेतल्यानंतर तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी एम्स दिल्ली येथे नेण्याची तयारी करीत असतानाच मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. बुधवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी भाऊसाहेब बोचरे, शिवाजी सुपनर, बाबासाहेब आवारे,पार्थ अकॅडमी व लक्ष अकॅडमीचे सैन्यात कार्यरत असलेले सैनिक योगेश धाकराव, ज्ञानेश्वर धाकराव, कलीम शेख, मोसीन पठाण, अजय मुलाणी, किसन गांगुर्डे, हवालदार महेश वाघ, प्रांजल वाघ या जवानांसह भाऊसाहेब लोणारी, भागवत बोचरे, पोलिसपाटील सुनील बोचरे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी सेवानिवृत्त मेजर अरुण गव्हाणे, भाऊलाल दराडे, आनंद गुंड, उत्तम इस्ते, सरपंच वैशाली आढांगळे, उपसरपंच लहानू मेमाने, माजी सरपंच विनोद जोशी, आबुभाई कादरी, मंडल अधिकारी पगार, तलाठी दीपक तिरडे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण उगले, प्राचार्य कडलक, वैद्यकीय अधिकारी गोलाईत उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button