नाशिक महिला पोलिसांना मुंबईत वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण | पुढारी

नाशिक महिला पोलिसांना मुंबईत वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाहतूक काेंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहर पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबईत प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार शहरातील पाच महिला व ४५ महिला कर्मचारी प्रशिक्षणासाठी भायखळा ट्रॅफिक ट्रेनिंग सेंटर येथे गेल्या आहेत. पंधरा दिवस प्रशिक्षण कालावधी असून, त्यात त्या वाहतूक नियोजनाचे धडे घेत आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असतात. मात्र वाहनांची वाढती संख्या, अपुरे वाहनतळ, मर्यादित रस्ते यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा प्रश्न गंभीर झाला आहे. बेशिस्त चालकांवर वारंवार कारवाई करूनही त्यांच्यात अपेक्षित सुधारणा होत नसल्याचेही निरीक्षण आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी शहरातील पोलिसांना मुंबईत वाहतूक नियोजनाचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच महिला अधिकारी व ४५ महिला कर्मचाऱ्यांना भायखळा प्रशिक्षण शाळेत पाठवण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ नोव्हेंबरपासून हे प्रशिक्षण सुरू झाले असून, ३० नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू राहील. त्यात वाहतुकीचे नियोजन, वाहतूक कोंडी होऊ नये, झाल्यास ती सोडवण्याचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये वाहतूक शाखेसह सातपूर पोलिस ठाणे, मोटर परिवहन विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button