पुणे : नवमतदारांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन | पुढारी

पुणे : नवमतदारांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

पुणे : जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना या संधीचा लाभ घेता यावा म्हणून २५ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये नवतरुण मतदारांसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.

त्यानुसार ९ नोव्हेंबर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये मतदार यादीतील लक्षित गटांसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. वयाची १८ वर्ष पुर्ण झालेल्या सर्व पात्र नवमतदारांना नोंदणीसाठी ८ डिसेंबरपूर्वी अर्ज क्र.६ भरता येणार आहे.

येत्या २५ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी एकूण ४५० महाविद्यालयांमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यातआले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र युवा मतदारांनी या विशेष शिबीरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना अर्ज क्र.६ त्यांच्या महविद्यालयात विशेष शिबीरादरम्यान भरुन द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Back to top button