नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद | पुढारी

नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने आज (दि. २३) प्रहार जनशक्ती पक्ष व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले.

यानंतर, आमच्या भावना शासना पर्यंत पोहच कराव्यात यामागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना देण्यात आले. उन्हाळी कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. महागडे कांदा बियाणे विकत घेऊन कांद्याची लागवड केली. त्यासाठी हजारो रुपये खर्च झाला आहे. कांद्याला भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला. मात्र कांदयाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाला शेतकऱ्यांच्या संतप्त भावना कळाव्यात यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने देवळा बाजार समितीत येऊन कांदा लिलाव बंद करून पाच कंदील येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलनकर्ते व शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, युवा तालुका अध्यक्ष बापू देवरे, तालुका अध्यक्ष नानाजी आहेर, युवा तालुका अध्यक्ष शशिकांत पवार, सटाणा तालुका अध्यक्ष गणेश काकुळते, खर्डे येथील उपसरपंच सुनील जाधव, विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार, माधव ठोंबरे, भाऊसाहेब पवार, शशिकांत ठाकरे, विनोद आहेर, नाना गांगुर्डे, रामदास पवार, नितीन देवरे आदी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button