हडपसर : बसथांबे काढल्याने प्रवाशांची गैरसोय | पुढारी

हडपसर : बसथांबे काढल्याने प्रवाशांची गैरसोय

हडपसर : पुढारी वृत्तसेवा :  हडपसर-स्वारगेट बंद पडलेल्या बीआरटी मार्गातील बसथांबे काढण्यात आले आहेत. मात्र, नव्याने बसथांबे उभारले नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तब्बल 16 बसथांब्याच्या प्लॅटफॉर्मवरील सिमेंट कट्टे उखडून ठेवल्याने प्रवासी अडकून जखमी होत आहेत. त्यामुळे पीएमपीएल व महापालिकेने तत्काळ बसथांबे उभारून प्लॅटफॉर्म दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी आहे.
बीआरटी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्या मार्गातील बसथांबे काढून घेण्यात आले आहेत. स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्गात काळूबाई चौक, रामटेकडी, वैदूवाडी, किर्लोस्कर ब्रीज व मगरपट्टा या ठिकाणी बसथांबे होते. प्रवासीसंख्या जास्त असल्याने एका ठिकाणी दोन थांबे होते. त्यामुळे 16 बसथांबे काढण्यात आले.

माजी नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले, की स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्गातील बसथांबे हे रस्त्याच्या कडेला उभे करावेत. रस्त्याच्या मध्ये असलेले बसथांबे धोकादायक होऊ शकतात. मुळात स्वारगेट-हडपसर बीआरटी दहा किलोमीटर अंतर आहे. मात्र, एक किलोमीटर ही बीआरटी येथे नाही, अपेक्षित 60 मीटर रुंदीचा रस्ता कोठेही दिसून येत नाही. त्यामुळे जोपर्यंत समान रुंदीच्या रस्त्याचे भू-संपादन होत नाही तोपर्यंत बीआरटी मार्ग गृहीत धरू नये.

बसथांब्याच्या ठिकाणी पथदिवे नसल्याने रात्री उखडलेल्या सिमेंटच्या ठेचा लागून नागरिक पडून जखमी होत आहेत. त्यामुळे पीएमपीएल व महापालिकेने तत्काळ बसथांबे उभारून प्लॅटफॉर्म दुरुस्त करून घेण गरजेचे आहे.
                                                   – नितीन आरू, सामाजिक कार्यकर्ते

या मार्गातील बसथांबे खालून कुजले होते. त्यामुळे ते काढून घेतले आहेत. याठिकाणी नवीन बसथांबे करणार आहोत. तसेच प्लॅटफॉर्मची दुरुस्ती करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत.
                                          – निरंजन तुळपुळेे,  अभियंता, पीएमपीएल

 

Back to top button