आरोग्य केंद्र : अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज होणार ‘पीएचसी | पुढारी

आरोग्य केंद्र : अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज होणार 'पीएचसी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 12 प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) अत्याधुनिक उपकरणे सीएसआर फंडातून देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. त्याला आता यश आले असून, अमेरिकेअर्स फाउंडेशनतर्फे सुमारे एक कोटीच्या सीएसआर फंडमधून आवश्यक छोट्या-मोठ्या विविध साधनसामग्रीसह सुमारे 145 वैद्यकीय उपकरणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे यांनी दिली.

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि उपाय, गर्भधारणा केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी, प्रसूती, जखमींवरील उपचार, ज्येष्ठांवरील उपचार आदींसाठी विविध वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता प्राथमिक आरोग्य केंद्रांना असते. या आवश्यकतेनुसार जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयत्नांतून ही उपकरणे मिळणार आहेत. अमेरिकेअर्सतर्फे सुमारे एक कोटीच्या सीएसआर फंडामधून ट्युबेक्टोमी सेट, एक्झामिनेशन टेबल, लॅरिंगोस्कोप, रेफ्रीजरेटर 165 लिटर, सक्शन मशीन (इलेक्ट्रिक/फूट ऑपरेटेड), बी.पी. अ‍ॅपरेट्स, स्टेथोस्कोप, फीटल डॉपलर, हब कटर, ई.सी.जी. मशीन, नेब्युलायझर, डिजिटल स्कोप (नाक, कान, घसा) तपासणीसाठी, वजन काटा (बालकांसाठी), स्टरिलायझर, प्रसूतीसाठी लागणारी उपकरणे, स्ट्रेचर, ऑक्सिजन ट्रॉली आदी वैद्यकीय उपकरणे 12 प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट स्वरूपात दिली जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या उपकरणांची यादी अमेरिकेअर्स फाउंडेशनला आरोग्य विभागाने सुपूर्द केली आहेत.

या केंद्राचा समावेश…

धोंडेगाव-नाशिक, सोमठाणे-नाशिक, सिन्नर, वा-हे- दिंडोरी, पाटोदा-येवला, अंजनेरी-त्र्यंबकेश्वर, न्यायडोंगरी-नांदगाव, ताहराबाद-बागलाण, खडकमाळेगाव-निफाड, उसवाड-चांदवड, निमगाव-मालेगाव, मळगाव-मालेगाव.

हेही वाचा:

Back to top button