तोतया तलाठ्याचा वृद्धेला गंडा ; तलाठी असल्याचे सांगून दहा हजार रूपये पळविले | पुढारी

तोतया तलाठ्याचा वृद्धेला गंडा ; तलाठी असल्याचे सांगून दहा हजार रूपये पळविले

नगर : पुढारी वृत्तसेवा : मी तलाठी आहे, तुमच्या बँक खात्यावर पैसे नाहीत. खात्यावर पैसे भरल्यावर पैसे भेटतील अशी बतावणी करून नेत्र तपासणी करीता चाललेल्या वृद्ध महिलेची दहा हजार 300 रूपयांची रक्कम पळविल्याची घटना बागरोजा हडको येथे सोमवारी (दि.21) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गेरूबाई सखाराम शिंदे (वय 65, रा. पळशी, ता. पारनेर) असे फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे या नेत्र तपासणीसाठी गावाहून येऊन नेप्ती नाक्यावर उतरल्या.

तेथून त्या दवाखान्यात जात असताना एकाने तलाठी असल्याचे सांगून त्यांना वाटेत अडविले. तसेच मी खडकवाडीचा असून अशोक गागरे यांचा मुलगा आहे, सांगितले. मी तलाठी असून तुमच्या खात्यावर पैसे नाहीत. त्यात पैसे टाकावे लागतील नंतर तुम्हाला मोदी सरकारचे पैसे मिळतील, असे सांगितले. त्यानंतर वृद्ध महिलेला तेथील एका लॅबच्या खुर्चीवर बसवून त्याठिकाणी गप्पा मारून महिलेकडील दहा हजार 500 रूपये बळजबरीने काढून घेतले. त्यातील दोनशे रूपये परत देऊन तेथून तो पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button