नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर | पुढारी

नाशिक : घे नवीन घर अन् अतिक्रमण कर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अत्यंत झपाट्याने वाढणार्‍या शहरांमध्ये नाशिकचे नाव प्राधान्याने घेतले जाते. सातपूर, मखमलाबाद, अंबड, चुंचाळे, पाथर्डी फाटा, आडगाव, नाशिकरोड, जेलरोड अशाच चहूबाजूने मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांना मागणीही मोठी आहे. मात्र, नवीन घर घेताना रहिवाशांकडूनच अतिक्रमणे केली जात असल्याने उपनगरांमधील रस्त्यांची कोंडी झाली असून, या भागांमध्ये छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.

सध्या नाशिकमध्ये रो-हाउसेस प्रकल्पांचा ट्रेंड सुरू आहे. फ्लॅटधारकांना रो-हाउसेसचे अधिक आकर्षण असल्याने, बांधकाम व्यावसायिकांकडून उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रो-हाउस प्रकल्प उभारले जात आहेत. शहराच्या चहूबाजूने कमीत कमी 35 लाखांपासून पुढे रो-हाउसेस उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे यास ग्राहकवर्गही मोठा असल्याने, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सर्व सदनिकांची विक्रीही होत आहे. कधीकाळी मोकळ्या दिसणार्‍या भूखंडावर काही महिन्यांतच रस्त्याच्या दोन्ही बाजूला टुमदार बंगले नजरेस पडत आहेत. हे चित्र शहराच्या सर्वच उपनगरांमध्ये बघावयास मिळत आहे. मात्र, याठिकाणी वास्तव्यास येणार्‍या रहिवाशांकडून आपल्या रो-हाउसच्या अवतीभोवती अवास्तव अतिक्रमण केले जात असल्याने, रस्त्यांची मोठी कोंडी होत आहे. बरेच रहिवासी नव्या घरात किराणा दुकान किंवा इतर घरगुती उद्योग सुरू करीत आहेत. त्याकरिता दुकानाच्या समोरची जागा व्यापून घेण्यासाठी बांधकाम केले जात आहे. हे बांधकाम रस्त्याला लागूनच असल्याने त्यावरून जर एखादे वाहन गेल्यास, वादाला तोंडही फुटत आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, अतिक्रमणांमुळे रस्त्यांचा श्वास कोंडला असून, यावरून वाहतूक करताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. दोन वाहने जर समोरासमोर आली तर त्यांना वाट काढणे अवघड होत आहे. यातून छोटे-मोठे अपघातही होत असल्याने, महापालिकेने अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी होत आहे.

पत्र्याचा शेडचा त्रास : कॉर्नरवरील रो-हाउस घेतलेल्या रहिवाशांकडून त्यावर पत्र्यांचे बांधकाम केलेले आहे. पत्र्यांचा पुढचा भाग बर्‍यापैकी पुढे काढलेला असल्याने, वाहने चालविणे अवघड होत आहे. विशेषत: स्कूल बसेसला याचा सर्वाधिक त्रास होताना दिसत आहे.

रस्त्यांवर पाणीच पाणी :रो-हाउसेसला अंगण नसल्याने अनेक उत्साही रहिवासी अंगणात सडा टाकण्याच्या नादात अख्खा रस्ताच धुऊन काढत आहेत. त्यामुळे सकाळच्या सुमारास या रस्त्यांवरून वाहने स्लिप होण्याचे प्रकारही वाढले आहेत. दररोज रस्त्यावर पाणी टाकले जात असल्याने, दुचाकी चालकांना मोठी कसरतच करावी लागत आहे.

चारचाकींची रस्त्यांवरच पार्कींग : बहुतांश रो-हाउसला दुचाकींचा विचार करूनच पार्किंग दिली जाते. अशात रहिवाशांकडे असलेल्या चारचाकी गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर एकेरी वाट होत असल्याने, दुसर्‍या वाहनांना तेथून वाट शोधणे अवघड होत आहे. अशात वादावादीच्या घटनाही दररोजच घडत आहेत.

गतिरोधकांचाही त्रास : गतिरोधक उभारताना रस्त्यांच्या नियमांचा विचार करावा लागतो. परंतु रहिवाशांकडून कुठलाही विचार न करता जागोजागी गतिरोधके उभारली जात आहेत. काही अंतरावरच गतिरोधके लागत असल्याने, वाहने चालविणेही अवघड होत आहे. यावरून अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

हेही वाचा:

Back to top button