Earthquake : इंडोनेशियातील भूकंपात 162 दगावले, 700 जखमी, 13 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले | पुढारी

Earthquake : इंडोनेशियातील भूकंपात 162 दगावले, 700 जखमी, 13 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

जकार्ता; वृत्तसंस्था : Earthquake : इंडोनेशियात सोमवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले. विविध ठिकाणी मिळून 162 जण त्यात मरण पावले, तर 700 वर लोक जखमी झाले आहेत. राजधानी जकार्तासह लगतच्या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण असून, रहिवाशांनी इमारती, घरे खाली केली आहेत. तब्बल 13 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 होती. जावातील सियांजूर येथे भूकंपाचे केंद्र होते. एकाच रुग्णालयात 20 मृतदेह मी पाहिले, असे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. भूकंपाने केलेला हाहाकार पाहता मृतांचा आकडा वाढेल, अशी शक्यताही त्याने वर्तविली. भूकंपाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओतून कोसळणार्‍या इमारती, ढिगारे दिसत आहेत. पुन्हा भूकंपाचे धक्के बसतील, अशी शक्यता वर्तविण्यात आल्याने लोकांनी घरे रिकामी केली आहेत. मोकळ्या मैदानांवर लोक जमलेले आहेत.

इंडोनेशिया ‘रिंग ऑफ फायर’मध्ये मोडत असल्याने येथे भूकंपाचे धक्के बसत असतात. या देशात अनेक लहान-मोठे ज्वालामुखी आहेत. भूकंपानंतर येथे त्सुनामीचाही धोका असतो. चालू वर्षात फेब्रुवारीत या देशात भूकंपाचे धक्के बसले होते. तेव्हा 25, तर जानेवारी 2021 मधील भूकंपात 100 वर लोक मरण पावले होते. 2004 मध्ये भूकंपासह त्सुनामी आली होती.

Back to top button