दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिला कबड्डी स्पर्धा; राजमाता जिजाऊ संघाला विजेतेपद | पुढारी

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिला कबड्डी स्पर्धा; राजमाता जिजाऊ संघाला विजेतेपद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या कबड्डी स्पर्धेच्या खुल्या गटात राजमाता जिजाऊ संघ, तर सबज्युनिअर 16 वर्षांखालील गटात कला क्रीडा विकास प्रकल्प संघाने विजेतेपद पटकाविले. दै. ‘पुढारी’ आयोजित या स्पर्धा नेहरू स्टेडियम (स्वारगेट) येथे पार पडल्या. या स्पर्धेच्या सबज्युनिअर गटाच्या उपांत्य लढतीमध्ये एस. बी. स्पोर्ट्स पळसदेव संघाचा तिरंगा स्पोर्ट्स क्लब आंबेगाव पठार संघाने 33-25 अशा 8 गुणांच्या फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

यामध्ये एस. बी. स्पोर्ट्सकडून वर्षा बनसुडे आणि पूजा घनवट यांनी तर तिरंगा संघाकडून आकांक्षा रेणुसे, ऋतुजा मुळे आणि गौरी देवकर यांनी चांगला खेळ केला. दुसर्‍या सामन्यामध्ये कला क्रीडा विकास प्रकल्प संघाने अभिनव संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत विजय मिळविला. या गटाची अंतिम फेरी अत्यंत चुरशीची झाली. कला क्रीडा विकास प्रकल्प संघाने तिरंगा स्पोर्ट्स क्लब संघाचा टायब्रेकमध्ये एका गुणाच्या फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

या सामन्यामध्ये मध्यंतरापर्यंत कला क्रीडा विकास प्रकल्प संघाने 18-11 अशी 7 गुणांची आघाडी मिळविली होती. दुसर्‍या डावात तिरंगा संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत निर्धारित वेळेत 34-34 अशी बरोबरी साधली. कबड्डी असोसिएशनच्या नवीन नियमानुसार टायब्रेकमध्ये 5-5 चढायांत सामना खेळविण्यात आला. सांघिक कामगिरीच्या बळावर कला क्रीडा विकास प्रकल्प संघाने सलग तिसर्‍यांदा विजेतेपद पटकाविले. तिरंगा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कला क्रीडा विकास प्रकल्प संघाकडून प्रिया गाढव, सरस्वती शिवमोरे आणि माया सोनवणे यांनी टायब्रेकमध्ये उत्कृष्ट खेळ केला. या सामन्यामध्ये पळसदेव येथील एस. बी. स्पोर्ट्स संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

महिला गटाच्या झालेल्या उपांत्य फेरीमध्ये राजमाता जिजाऊ संघाने प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा 44-24 असा 20 गुणांच्या फरकाने दण-दणीत पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यामध्ये राजमाता संघाकडून पहिल्या डावात 4 बोनस गुण, तर दुसर्‍या डावात 1 बोनस गुण मिळविला. बालवडकर संघाकडून पहिल्या डावामध्ये 1 बोनस गुण मिळविला. दुसर्‍या उपांत्य लढतीत द्रोणा स्पोर्ट्स क्लब संघाने बारामतीच्या स्पोर्ट्स अकादमी संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

या स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये राजमाता जिजाऊ संघाने द्रोणा स्पोर्ट्स क्लब संघाचा 43-33 असा 10 गुणांच्या फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या सामन्यामध्ये मध्यंतरालाच राजमाता जिजाऊ संघाने मोठी आघाडी घेत सामना आपल्या बाजूने वळविला होता. या स्पर्धेत राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद, द्रोणा स्पोर्ट्स क्लब संघाने उपविजेतेपद, प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने तृतीय स्थान, तर बारामतीच्या स्पोर्ट्स अकादमी संघाने चौथा क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेत पंच प्रमुख म्हणून संदीप पायगुडे, निरीक्षक म्हणून राजेंद्र आंदेकर यांनी, तर मैदानाची व्यवस्था सिंहगड क्रीडा मंडळ आणि आकांक्षा कला क्रीडा मंच यांच्या खेळाडूंनी पाहिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सामनाधिकारी आणि पदाधिकारी तसेच कार्यकारिणी सदस्य यांचे सहकार्य मिळाले. मैदान बनविण्यासाठी राजाभाऊ पासलकर, सागर वाळके, विजय पवार, अनिल यादव, संतोष जगदाळे यांचे सहकार्य लाभले.

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ऑक्सिरीच, हेल्थ पार्टनर डॉ. ऑर्थो, अ‍ॅकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूट, फायनान्शिअल पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मीडिया पार्टनर झी टॉकीज, या सर्व प्रायोजकांच्या सहकार्याने आणि पुणे महानगरपालिका व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्य लाभले. या स्पर्धा पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आल्या.

किशोरी गट निवड समिती सदस्य म्हणून ऋषिकेश मद्रासी, राजेंद्र पायगुडे, सुजाता संगीर यांनी काम पाहिले. किशोरी गटात निवड झालेल्या खेळाडूंचा संघ सराव शिबिरानंतर लातूर येथे होणार्‍या सबज्युनिअर गटाच्या स्पर्धेत पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुणे जिल्ह्यातील 800 खेळाडूंनी आणि पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता. सध्या अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा सुरू असून देखील दै. ‘पुढारी’च्या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

…या खेळाडूंचा वैयक्तिक सन्मान
या स्पर्धेमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून राजमाता जिजाऊ संघाची सलोनी गजमल, उत्कृष्ट पकड म्हणून द्रोणा स्पोर्ट्स क्लबची साक्षी लाथवडे, तर उत्कृष्ट चढाई म्हणून प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अंकिता पिसाळ हिला गौरविण्यात आले. तसेच प्लेअर ऑफ द डे म्हणून बारामती स्पोर्ट्स क्लबची साक्षी काळे, सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबची ऐश्वर्या काळे, तर राजा शिवछत्रपती संस्थेची देवयानी गोगावले यांना गौरविण्यात आले.

…यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संचालक, चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन संजय चोरडिया, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे इव्हेंट हेड सचिन झगडे आणि बाणेर बालेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते लहू बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिसएशनच्या उपाध्यक्षा आणि अर्जुन पुरस्कारार्थी शकुंतला खटावकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, कार्यवाह राजेंद्र आंदेकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शीतल मारणे, यांसह मान्यवर उपस्थित होते. संतोष धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button