नाशिक : परिचय मेळाव्यात 300 वरांसाठी केवळ 70 वधूंचा सहभाग

नाशिक : परिचय मेळाव्यात 300 वरांसाठी केवळ 70 वधूंचा सहभाग
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे
मुलींच्या जन्मदरात घसरण ही अत्यंत चिंतेची बाब असून, त्याचे समाजात पडसाद उमटताना दिसत आहेत. नुकत्याच एका समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यातून मुला-मुलीच्या जन्मदरात असलेल्या या तफावतीचा अनुभव समोर आला. या मेळाव्यात 300 वर गुडघ्याला बाशिंग बांधून सहभागी झाले होते. मात्र, वधूंची संख्या वरांच्या तुलनेत निम्मीही नसल्याने, आयोजकांसह वधुपित्यांनाही मोठा पेच पडला. त्याचबरोबर मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंताही मेळाव्यात प्रकर्षाने दिसून आली.

सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अनेक कुटुंबाकडून मुला-मुलींचा शोध घेतला जात आहे. विशेषत: वराकडच्या मंडळींकडून वधू शोधण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. मात्र, मुलींच्या वाढत्या अपेक्षांपुढे वराकडील मंडळी हतबल होताना दिसत आहे. बहुतांश समाजामध्ये तर मुला-मुलींचे प्रमाणात मोठी तफावत असल्याने, समाजातील मुलीशी लग्न करणे अनेकांसाठी अवघड होताना दिसत आहे. अशात सर्वधर्मीय विवाह संस्था मोठ्या प्रमाणात कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह लावून देण्यावर भर दिला जात आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात मुलींच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत मोठी घट झाली आहे. ग्रामीण भागात जन्म घेणार्‍या हजार मुलांमागे 2019 मध्ये 963 मुलींची संख्या होती. 2022 मध्ये ही संख्या 939 वर आली आहे. तीन वर्षांत 36 ने संख्या कमी झाल्याने, मुलां-मुलींमधील ही तफावत चिंता वाढविणारी आहे. तर दुसरीकडे मुलींच्या मुलाकडून वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करणे अवघड होत असल्याने, मुलांचे लग्नाचे वय वाढत आहे. त्यामुळे वर पित्याकडे ही मोठी समस्या निर्माण होत असून, आपल्या मुलासाठी वधू शोधणे अवघड होताना दिसत आहे.

शिक्षणात तफावत :  मुलींना उच्च शिक्षण देण्याबाबत पालक अधिक सतर्क असल्याने, मुलांच्या तुलनेत मुलीच अधिक शिक्षित असल्याने शिक्षणातील तफावतदेखील लग्न जुळण्यामध्ये अडथळा ठरत आहे. मुलींच्या मागणीनुसार मुलगा आपल्या बरोबरीने किंवा आपल्यापेक्षा अधिक शिकलेला असावा. त्याला नोकरी असावी. चांगला पगार असावा या अपेक्षाही वर कुटुंबीयांची डोकेदुखी वाढवत आहेत.

सर्वच समाजात मुली मिळणे अवघड : सध्या सर्वच समाजात मुली मिळणे अवघड आहे. विशेषत: ब्राह्मण, जैन, मराठा तसेच बौद्ध समाजातही याची तीव्रता अधिक दिसून येते. ज्या समाजाची संख्या कमी आहे, उदा. गोंधळी अशा समाजातदेखील मुलींची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्या मुला-मुलींची पसंती होती, त्यामध्ये मुलींच्या अपेक्षा अडचणीच्या ठरतात. मुलाचे घर, सुबत्ता यात कमी असेल तर वधूच्या कुटुंबीयांकडून कुठलीही तडजोड केली जात नाही.

शेतकरी मुलांची अवस्था वाईट : कोणत्याही नोकरी व्यवसायापेक्षा शेती हा कायमस्वरूपी व शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय असला तरी मुलींना शेतकरी नवरा नको हीच वस्तुस्थिती आहे. मुलाच्या नावे शेती असावी, ही जरी सकारात्मक बाब असली तरी, तो नोकरदार, उच्चशिक्षित असावा ही मुलींची अट आहे. त्याचबरोबर त्याचे शहरात वास्तव्य असावे, हीदेखील अट असल्याने शेतकरी मुलांची अवस्था वाईट आहे.

मुलींना नोकरदार मुलगा हवा म्हणून नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससीची तयारी केली. उशिरा का होईना एमपीएससी परीक्षेत यश मिळवून नोकरी प्राप्त केली. मात्र, या सर्व प्रयत्नात वय वाढले. आज 42 वर्षे वय असल्याने, लग्न करताना अडचणीचे ठरत आहे. मुली बघणे सुरू आहे. नोकरी असल्याने काहींचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मात्र वाढते वय अडचणीचे ठरत आहे, अशी प्रतिक्रिया एका अविवाहित तरुणाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news