मध्य प्रदेशातील तीन डोळे, तीन शिंगे असलेले नंदीबाबा निवर्तले | पुढारी

मध्य प्रदेशातील तीन डोळे, तीन शिंगे असलेले नंदीबाबा निवर्तले

छतरपूर;  वृत्तसंस्था :  मध्य प्रदेशातील छतरपूर येथील जटाशंकर धाम मंदिरातील तीन डोळे, तीन शिंगे असलेल्या नंदीला शुक्रवारी अंतिम निरोप देण्यात आला. देशभरातून मोठ्या संख्येने भाविकांचा जनसमुदाय अंत्यविधीला हजर होता. मध्य प्रदेशातील बुंदेलखंड, विंध्य, माळव्यातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार तसेच खानदेशातूनही भक्तगण हजर राहिले.

वैदिक मंत्रोच्चारासह नंदीबाबांना समाधी देण्यात आली. नंदी महाराजांना श्रद्धांजली म्हणून छतरपुरातील सर्व दुकाने उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली होती. मंदिर परिसरात जेथे नंदीबाबांचे निवासस्थान होते, तेथेच 5 बाय 6 चा गड्डा खणण्यात आला. मंदिर समितीकडून येथे 2 लाख रुपये खर्चून नंदीबाबांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. नंदीमंदिर म्हणून ते ओळखले जाईल.

स्वतंत्रपणे नंदीचे असे हे देशातील पहिलेच मंदिर ठरणार आहे. पंडित खिलानंद गौतम आणि प्रदीप शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली सारा अंत्यविधी पार पडला. नंदी बाबा 15 वर्षांपूर्वी 6 वर्षांचे असताना भटकत भटकतच अगदी योगायोगाने श्री जटाशंकर धाम येथे आले होते आणि तेव्हापासून त्यांनी येथेच ठाण मांडले होते. नंदीबाबांना समाधी देण्यापूर्वी एका वासराला पाचारण करण्यात आले. वासराने खड्ड्याला परिक्रमा घातली. त्रिनेत्रधारी व तीन शिंगे असल्याने नंदीबाबाचे एकदा अपहरणही झाले होते. उज्जैनच्या 2016 मधील कुंभमेळ्यादरम्यान ही घटना घडली होती.

Back to top button