आ.छगन भुजबळ : एकात्मतेसाठी सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे | पुढारी

आ.छगन भुजबळ : एकात्मतेसाठी सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
समाजातील गोरगरीब जनतेच्या हिताच्या द़ृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांची परंपरा अतिशय महत्त्वाची आहे. ही परंपरा संस्थेच्या वतीने कायम सुरू ठेवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक जिल्हा मुस्लीम उत्कर्ष समिती, मुस्लीम फाउंडेशन लासलगाव व नाज-ए-वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या प्रांगणात भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा झाला. नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. सामुदायिक विवाह सोहळ्यात 17 जोडप्यांचे विवाह पार पडले. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. सामूहिक सोहळ्यामुळे विवाहाच्या खर्चातील बचत होऊन हा निधी नवदाम्पत्याला भावी आयुष्यात वाटचालीसाठी उपयोगी पडेल. तसेच गोरगरीब कुटुंबीयांना या सोहळ्यातून अधिक मदत होते, असे स्पष्ट करत भुजबळ म्हणाले की, फातिमा शेख यांचा आदर्श मुलींनी ठेवावा. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सावित्रीबाई फुले यांना साथ देऊन महिलांना शिक्षण दिले. मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे सांगत समाजातील एकात्मतेसाठी तसेच चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी, असे सोहळे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी सरपंच कुसुमताई होळकर, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी सुरासे, ज्येष्ठ नेते अशोक होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, युवती शहराध्यक्षा सोनिया होळकर, तालुकाध्यक्ष मनीषा वाघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सादिक पठाण, नाशिक शहराध्यक्ष हनीफ बशीर, लासलगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अफजल शेख, हाजी बिसमिल्ला शहा, डॉ. मुज्जमिल मणियार, अल्ताफ शहा, निसार शेख, लतिफ तांबोळी, फरिदा काजी यांनी केले होते.

हेही वाचा:

Back to top button