गोळीबार केल्याने चोरटे पसार ; बालमटाकळीत दुसर्‍या ठिकाणी लाखाचा ऐवज लांबविला | पुढारी

गोळीबार केल्याने चोरटे पसार ; बालमटाकळीत दुसर्‍या ठिकाणी लाखाचा ऐवज लांबविला

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे शनिवारी (दि.19) पहाटे अडीचच्या सुमारास दिनेश वैद्य यांच्या घरी तीन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेजारीच राहत असलेले त्यांचे मोठे बंधू उपसरपंच तुषार वैद्य यांनी हवेत गोळीबार केल्याने चोरटे पसार झाले. परंतु, वैद्य यांच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेल्या योगेश परदेशी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 1 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

बालमटाकळीचे उपसरपंच तुषार वैद्य यांचे भाऊ दिनेश वैद्य यांच्या घराच्या छतावरील लाकडी दरवाजा तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सामानाची उचकापाचक करत असताना झालेल्या आवाजाने दिनेश वैद्य व त्यांची पत्नी जागे झाले. परंतु, चोरट्यांनी दाराला बाहेरून कडी लावल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे त्यांनी शेजारीच राहणारे त्यांचे बंधू तुषार वैद्य यांना चोरटे आल्याचा मेसेज दिला. परंतु, त्यांच्या दरवाजालाही चोरट्यांनी बाहेरून कडी लावल्याने त्यांनाही बाहेर येता आले नाही. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखून बंगल्याच्या छतावर जाऊन हवेत गोळीबार केल्याने चोरटे पसार झाले.

त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच राहणारे योगेश परदेशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन, 1 ग्रॅमची सोन्याची नथ, दोन मोबाईल फोन, 30 हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच लहान मुलांच्या हातातील व कंबरेचे चांदीचे दागिने असा अंदाजे 1 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दरम्यान, तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ विभागाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा लगस, कॉन्स्टेबल पी. सी. जंगले, पी. सी. आरु, शहाजी आंधळे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक विलास पुजारी, बोधेगाव दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान बडधे, पो.ना. सोमनाथ घुगे यांनीही घटनास्थळी पाहणी केली.

Back to top button