यंदा विदेशी पक्ष्यांचे महाराष्ट्राच्या सर्वच भागांत आगमन झाले. मात्र, यंदा जलाशये पाण्याने तुडुंब भरल्याने पक्ष्यांना मासे पकडण्यासाठी जी उथळ जागा लागते ती तयारच झाली नाही, त्यामुळे पक्षी विदेशातून येऊनही त्यांना उथळ पाण्याची ठिकाणे शोधावी लागत आहेत.
हिवाळा सुरू झाला, की महाराष्ट्राच्या विविध भागांतील छोट्या-मोठ्या जलाशयांवर पक्ष्यांचा कुंभमेळा भरतो. पावसाळा संपल्याबरोबर हिवाळ्याच्या सुरुवातीलाच देशी-विदेशी पक्ष्यांचे थवे दिसू लागतात. त्यामुळे जलाशयांवरचे पर्यटन वाढते. पक्षिनिरीक्षणाची ही मोठी पर्वणीच असते. मात्र, यंदा नोव्हेंबर उजाडला, तरीही जलाशयंवर पक्षी दिसेनात, त्यामुळे पक्ष्यांचे स्थलांतर लांबले, असे वाटू लागले. मात्र, पक्षिनिरीक्षक व तज्ज्ञांच्या मते विदेशी व देशी पक्षी त्यांच्या ठरलेल्या वेळेतच महार- राष्ट्रात आले आहेत. मात्र, यंदा झालेल्या पावसामुळे जलाशये पाण्याने तुडुंब भरली आहेत. पाणथळीच्या जागांवर थोडीसुध्दा उथळ जागा शिल्लक नसल्याने पक्ष्यांना मासे खाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे.
भारतात सैबेरियातून मोठा प्रवास करून महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्य आशिया, युरोप, रशिया, मंगोलिया, सैबेरिया या विदेशी भागांतून पक्षी येतात. तसेच, हिमालयात बर्फ वितळू लागताच तेथील पक्षी राज्याच्या विविध भागांत स्थलांतरित होतात. यात पाणबदक, करकोचे, तुतवार, सीगल, स्टेप इगले, मॅन्टंगो हरिहर, शार्ट इयर आऊल हे पक्षी दिसतात. जंगलात दिसणाऱ्या पक्ष्यांत ब्लू कॅप, रॉक थर्स्ट, इंडियन ब्लू रॉबिन हे पक्षी दिसू लागतात. सध्या काही ठिकाणीच उथळ पाणी असल्याने चक्रवाक, ब्लॅक स्टर्क (कृष्ण बलाक), युरेशियन आयस्टर कॅचर, पेटीग्रीन फाल्कन हे पक्षी दिसत आहेत.
पक्षी येतात. त्यांना पॅसेज मायग्रेट म्हणतात. कारण, ते भारतात काही काळ थांबून हिंद महासागर ओलांडून पुढे दक्षिण आफ्रिकेत जातात. सैबेरियातील पक्षी ५ ते ७ हजार किमीचा टप्पा पार करतात. त्यांचे प्रवासाचे टप्पे ठरलेले असतात. यंदा सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने पक्षी मोठ्या जलाशयावर दिसत नाहीत. कारण, त्यांना उतरण्यासाठी उथळ जागाच शिल्लक नाही. विदेशी पक्षी आले आहेत. पण, ते छोट्याछोट्या जलाशयंवर थांबले आहेत. त्यामुळे मोठ्या जलाशयावर ते दिसत नाहीत. उन्हं तापून जलाशये थोडी उथळ झाली, की पक्षी मोठ्या प्रमाणावर दिसू लागतील, असा विश्वास पुण्यातील पक्षीतज्ज्ञ स्वप्निल थत्ते यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.
पक्ष्यांचे आगमन वेळेतच झाले आहे. पण, पाणथळीच्या जागांवर पक्ष्यांना उतरण्यासाठी जी उथळ जागा लागते ती अजून तयार न झाल्याने पक्षी छोट्या-छोट्या जलाशयांवर विस्थापित झाले आहेत. जानेवारीत उन्हें तापल्यावर जलाशयांवर जागा तयार होईल, तेव्हा पक्षी मोठ्या संख्येने दिसू लागतील. त्यांच्या आगम, मुक्काम आणि प्रस्थान, यात फारसा फरक पडणार नाही.
– दिलीप यादी, पक्षितज्ज्ञ, औरंगाबाद