एकनाथ खडसेंना धक्का! भाजप आमदाराविरुध्दची याचिका हायकोर्टाने फेटाळली | पुढारी

एकनाथ खडसेंना धक्का! भाजप आमदाराविरुध्दची याचिका हायकोर्टाने फेटाळली

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावरून खडसे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र खडसे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. स्थानिक उमेदवाराच्या वादावरून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने दूधसंघ निवडणुकीत मुक्ताईनगर तालुका मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगेश चव्हाण हे चाळीसगाव तालुक्यातील असताना सुध्दा मुक्ताईनगर मतदारसंघातून मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

मुक्ताईनगरात चुरशीची लढत होणार…

आ. मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिला होता. त्यानंतर मंदाकिनी खडसे ह्या हायकोर्टात गेल्या होत्या. परंतू हायकोर्टानेही आज त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मुक्ताईनगर मतदार संघातून मावळत्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्यासमोर आमदार मंगेश चव्हाण यांचे तगडे आव्हान असल्याने निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फटाके फोडून जल्लोष…

न्यायालयाचा निकाल जाहीर होताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळेस भाजप ओबीसी सेलच्या रेखा पाटील, मिलिंद चौधरी, अरविंद देशमुख, दिशांत जोशी, मनोज पाटील, राहुल पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button