बुलढाणा : शेगावमध्ये राहुल गांधी वारकऱ्यांसोबत पाऊली खेळणार, गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार | पुढारी

बुलढाणा : शेगावमध्ये राहुल गांधी वारकऱ्यांसोबत पाऊली खेळणार, गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ बुलढाणा जिल्ह्यात शेगांव येथे १८ नोव्हेंबरला दाखल होत आहे. यात्रेची राज्यातील दुसरी व शेवटची सभा शेगावात होणार असून ती अभूतपूर्व व विराट व्हावी यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. एक हजार वारक-यांसह राहुल गांधी हे वारकरी वेशात टीळा-गंध लावून रिंगण सोहळ्यात पाऊली खेळणार आहेत.

शुक्रवारी अकोला जिल्ह्यातून शेगांव जवळील वरखेड फाट्यावर भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या ठिकाणी राहुल गांधींसह पदयात्रींचे भव्य स्वागत केले जाईल. श्री गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने राष्ट्रवंदना सादर होईल. वरखेड फाट्यावर पाच एकर शेतात श्री विठ्ठलाची २१ फुट उंचीची भव्य मुर्ती स्थापित केली आहे. येथे एक हजार वारक-यांसह राहुल गांधी वारकरी वेशात टीळा-गंध लावून विठ्ठलाभोवती रिंगण करत पाऊली खेळणार आहेत. यानंतर ते गजानन महाराज मंदिरात जाऊन समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहेत. सायंकाळी आनंदसागर विसाव्याजवळ २५ एकराच्या भव्य मैदानावर जाहीर सभा होणार आहे. ‘नफरत तोडो, भारत जोडो’ हा नारा देत निघालेल्या या यात्रेला लोकांचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता शेगावातील सभेबाबत मोठी उत्सुकता आहे. तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेले शेगांव राज्यात मध्यवर्ती ठिकाणी असल्याने इथल्या सभेला पाच लाखांहून अधिक लोकांची उपस्थिती राहण्याचा अंदाज आयोजकांकडून व्यक्त होत आहे. यात्रेच्या भव्य स्वागतासाठी शेगांव नगरीत जय्यत तयारी झाली आहे. स्वागत कमानी, होर्डिंग्ज, बॅनर्सनी सभेचा मोठा माहौल तयार झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button