Gold Price Today : सोने-चांदी दरात मोठी उसळी, ‘सेफ हेवन’ मालमत्ता म्हणून मागणी वाढली, जाणून घ्या दर

Gold Price Today : सोने-चांदी दरात मोठी उसळी, ‘सेफ हेवन’ मालमत्ता म्हणून मागणी वाढली, जाणून घ्या दर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोने- चांदी दराने (Gold Price Today) सलग तिसऱ्या दिवशी उसळी घेतली. बुधवारी (दि.१६) शुद्ध सोन्याचा दर (२४ कॅरेट) प्रति १० ग्रॅम ५२,९५२ रुपयांवर पोहोचला. तर चांदी प्रति किलो ६१,७८४ रुपयांवर गेली. लग्नसराई सुरु झाल्याने सोन्याला मागणी वाढली आहे. याचदरम्यान सोने-चांदी दरात तेजी आली आहे. बुधवारी सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. अमेरिकेतील महागाई कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात अधिक वाढ होणार नाही या शक्यतेने सोन्याच्या दरात तेजी आली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,९५२ रुपयांवर खुला झाला आहे. तर २३ कॅरेट सोने ५२,७४० रुपये, २२ कॅरेट ४८,५०४ रुपये, १८ कॅरेट ३९,७१४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,९७७ रुपयांवर खुला झाला आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या दर वाढ झाली आहे. काल मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,८७७ रुपयांवर होता. त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा भाव ०.५ टक्क्याने वाढून प्रति १० ग्रॅम ५३ हजारांवर पोहोचला आहे. चांदीही वधारली आहे. एमसीएक्सवर ५ डिसेंबर २०२२ डिलिव्हरी सोन्याचा दर २३५ रुपयांनी वाढून ५२,९८० रुपयांवर व्यवहार करत आहे. रशिया- युक्रेन युद्धाच्या दरम्यान मार्चमध्ये सोन्याचा दर ५५ हजारांपर्यंत गेला होता. कोरोना काळात ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने ५६,२०० रुपयांवर जाऊन उच्चांक गाठला होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड ०.४ टक्क्याने घसरून दर प्रति औंस १,७७१ डॉलरवर आले आहे.

दरम्यान, पोलंडमध्ये रशियन क्षेपणास्त्र पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन) म्हणून सोन्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा भू-राजकीय तणाव वाढतो तेव्हा सोन्याचे दरही वाढतात. (Gold Price Today)

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news